शिवतिर्थावर धुळवड, मैदानातील लाल माती काढून टाकण्याची होतेय मागणी

133

छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे (शिवाजी पार्क) सुशोभिकरण करून यावर कायमस्वरुपी हिरवळ निर्माण करण्यासाठी महापालिकेच्यावतीने मैदानावर लाल माती टाकण्यात आली होती. मैदानाच्या हिरवळीसाठी तब्बल ४०० ते ५०० ट्रक लाल माती टाकण्यात आली होती. परंतु याची योग्यप्रकारे देखभाल होत नसल्याने ही लाल मातीच आता शिवाजी पार्ककरांची डोकेदुखी ठरत आहे. धुळमुक्त शिवाजीपार्कचा परिसर करण्यासाठी राबवलेला या प्रकल्पामुळे गुलाल उधळावा त्याप्रमाणे लाल माती प्रत्येक इमारतींवर उधळली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतिर्थावरच या लाल मातीची उधळण होत असल्याने हा बंगलाही लाल मातीने माखून गेला आहे. त्यामुळे मैदानावरील ही लाल माती त्वरीत काढून टाकण्याची मागणी शिवाजीपार्कमधील स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

मुंबईतील दादर छत्रपती शिवाजी महाराज उद्यान अर्थात शिवाजी पार्कमधील जनतेला धुळीचा त्रास होत असल्याने तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तत्कालिन उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून धुळमुक्त शिवाजीपार्क करण्याच्यादृष्टीकोनातून त्यांनी कायमस्वरुपी हिरवळ राखण्याचा प्रयत्न केला. यासाठी मैदानाच्या सुशोभिकरणाचा प्रकल्प हाती घेतला. यामध्ये मैदानातील विहिरी पुनजिर्वित करून त्याद्वारे कायमस्वरुपी पाण्याचा शिडकावा करण्याचा आराखडा तयार केला होता. त्यामुळे मैदानाचे सुशोभिकरण तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंगची योजना आदींसाठी सुमारे ४ कोटी रुपयांचा खर्च या मैदानात करण्यात आला. परंतु या मैदानावरील हिरवळ काही राहिलेली नसून उलट यासाठी टाकलेली लाल मातीची धुळ उडून आसपासच्या इमारतींमधील रहिवाशांची डोकेदुखी बनली आहे. त्यामुळे आधीचे शिवाजीपार्क बरे होते, ती धुळ परवडली पण ही लाल मातीची धुळ नको असे म्हणण्याची वेळ शिवाजीपार्कमधील रहिवाशांवर आली आहे. त्यामुळे या मैदानात टाकलेली सर्व लाल माती काढून टाकण्यात यावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी महापलिकेकडे केली असून ही माती काढणे अशक्य असल्याचे मत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मांडले आहे. या मैदानावर पाण्याची व्यवस्था असल्याने महापालिकेच्या कामगारांमार्फत यावर पाण्याचा शिडकावा करून ही धुळ उडणार नाही याची काळजी घेतली जाईल,असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे या शिवाजीपार्कमधील धुळधाणीचा त्रास खुद्द मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही होत आहे. राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतिर्थावरच लाल मातीची धुळ उडत असून त्यामुळे या धुळीमुळे तेही त्रस्त आहेत.

या मैदानातील धुळीची समस्या कायमस्वरुपी दूर करण्यासाठी शिवाजी पार्कमधील जनतेने थेट महाराष्ट्र प्रदुषण मंडळाकडे तक्रार नोंदवली आहे. त्यातच स्थानिक शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी शिवाजीपार्क परिसरातील प्रदुषण समस्या तसेच कायदा आणि सुव्यवस्था यांसह इतर नागरी समस्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी थेट संवाद आयोजित केला. यामध्ये लोकप्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि सुजाण नागरिकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी सोमवारी १० एप्रिल रोजी रोजी शिवाजी पार्क जिमखाना येथे चर्चा सत्र आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे या चर्चा सत्रांनंतर महापालिका प्रशासन काय भूमिका घेते तसेच यावर काय तोडगा काढते हे स्पष्ट होईल.

(हेही वाचा – शिवाजी पार्क प्रदूषणमुक्त करण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी घेतला पुढाकार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.