मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मंत्री, आमदारांसह जय श्रीराम म्हणत लखनऊमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात, मोठ्या जल्लोषात मुख्यमंत्र्यांचे लखनऊमध्ये स्वागत करण्यात आले. या अयोध्येच्या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी, ९ एप्रिलला एक मोठी घोषणा करणार असल्याची चर्चा सुरू आहे. उत्तर प्रदेशात महाराष्ट्र भवन बांधणार असल्याची घोषणा रविवारी मुख्यमंत्री शिंदे करणार असल्याची शक्यता आहे. याबाबत मंत्री दीपक केसरकर यांनी देखील शुक्रवारी माध्यमांसोबत बोलताना संकेत दिले होते.
दीपक केसरकर काय म्हणाले?
‘चांगले काम करताना श्रीरामाचे आशीर्वाद मिळायला पाहिजे. जर महाराष्ट्राचे राम राज्य व्हायचे असेल, तर आपल्याला अयोध्येच्या मंदिरात जाऊन रामाचे आशीर्वाद घेतलेच पाहिजे आणि त्याच बरोबर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचे जे नात आहे. कारण आग्राहून सुटका झाल्यानंतर स्वतः छत्रपती संभाजी महाराज हे उत्तर प्रदेशात होते आणि तिथल्या लोकांनी त्यांची काळजी घेतली होती. काशीमधले अनेक पंडित हे मराठी आहेत, अजूनही मराठीत बोलतात, मी ज्यावेळेला मराठी विश्वपरिषद घेतली होती. त्यावेळेला ते आले होते. आणि हे जे नात आहे, ते पुन्हा एकदा दृढ होत आहे. आम्ही जसे उत्तर प्रदेश भवन मुंबईत बांधले आहे, तसेच महाराष्ट्र भवन अयोध्येत व्हावे. जेणेकरून रामाचे आशीर्वाद घेण्यासाठी जे जे मराठी बांधव अयोध्येला जातील, त्याच्या राहण्याची सोय होईल. इतक ते उत्कृष्ट भवन हे बांधण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मनिषा आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट होणार आहे. त्यातून चांगले काहीतरी घडेल याची मला अपेक्षा आहे, असे दीपक केसरकर म्हणाले होते.
(हेही वाचा – उद्धव ठाकरे यांच्या मनातील मुख्यमंत्री महाराष्ट्रात, त्याच्यामुळे त्यांना वाईट वाटत नसेल – दीपक केसरकर)
Join Our WhatsApp Community