सावरकर स्मारकात ७२ वर्षांच्या प्रमोद नाईक यांनी घेतला कोलू फिरवण्याच्या अमानवीय शिक्षेचा अनुभव

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कोलू फिरवून किती भयावह त्रास सहन केला असेल...

183

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमान येथे कारागृहात अमानुष शिक्षा भोगली. त्यातील अंगभर बेड्या घालून कोलू ओढून तेल काढणे हा अत्यंत वेदनादायी अनुभव होता. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे त्या कोलूची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे. वीर सावरकर समजून घेण्यासाठी अनेक जण स्मारकात येतात तेव्हा ते अवश्य कोलू ओढण्याचा अनुभव घेतात. पण ७२ वर्षीय प्रमोद नाईक यांनी त्याचा नुसता काही सेकंदात अनुभव न घेता तो काही तास घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना खऱ्या अर्थाने वीर सावरकर यांनी अनुभवलेल्या अमानुष शिक्षेचा काही अंशी अनुभव आला.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अंदमानात कोलूला जुंपून तेल काढण्याची अमानुष शिक्षा देण्यात आली होती. यात तात्यारावांना काय यातना भोगाव्या लागल्या असतील, त्याचा अनुभव मला आला. कोल्हू फिरवताना बेड्यांमुळे पॅंट असूनही कासली गेल्याने होणारा त्रास लक्षात घेता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तेथे हा भयावह त्रास कसा सहन केला असेल त्याची अनुभूती मिळाली, असे उद््गार ७२ प्रमोद नाईक यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात बोलताना काढले.

स्मारकात येवून त्या शिक्षेचा घेतला अनुभव

दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानासमोरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात दर्शनी भागातच अंदमानच्या तुरुंगाची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे. तसेच अंदमानात ब्रिटिशांनी कैद्यांना तेल काढण्यासाठी कोलू ओढण्याची अमानवीय शिक्षा दिली होती. त्या शिक्षेचा अनुभव  घेता यावा यासाठी इथे कोलूची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे. या कोलूमधून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जसे तेल काढण्यासाठी ब्रिटिशांनी अंदमानात जुंपले. उन्हात, पावसात अशी शिक्षा दिली होती. त्याचा अनुभव घेण्यासाठी प्रमोद नाईक यांनी सावरकर स्मारकाला त्यासाठी कोलू फिरवण्यास अनुमती देण्याची विनंती केली होती. त्यानुसार रविवारी ९ एप्रिल २०२३ या दिवशी त्यांनी सावरकर स्मारकात येऊन हा अनुभव घेतला. प्रथम त्यांनी बेड्या घालून कोलू ओढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या पँटवरूनही त्या बेड्यांमुळे कासले गेल्याने त्यांनी बेड्या काढून कोलू ओढला. त्यासाठी त्यांनी ५ किलो शेंगदाणे घेतले होते. त्यापैकी अडीच किलो शेंगदाणे कोलूमध्ये टाकले. कोलूला असलेला दांडा उचलणेही कठीण असून त्यासाठी दोन माणसे लागतात, हे त्यांना लक्षात आले. तर कोलू द्वारे सुमारे दोन ते अडीच तास त्यांनी थांबत थांबत कोलू चालवून शेंगदाणे बारीक केले.

दम लागल्याने अखेर कोलू फिरवणे थांबवले

हा कोलू सावरकर स्मारकात उन्हात नाही तेथे थेट ऊन येत नाही. मात्र तरीही या सध्याच्या उन्हाळ्याचा त्रास आणि कोलूची कृती यातून माणसाच्या अंगातून घामाच्या धारा तर निघतातच पण त्याशिवाय ताकद लावायला लागते, गोल फिरवत चक्करा मारायला लागतात. आपण मध्ये मध्ये थांबून हा प्रयत्न केला मात्र नंतर दमल्याने तेथेच पथारी टाकून पडलो. त्यानंतर सावरकर स्मारकाच्या कर्मचाऱ्यांनी मला आतमध्ये नेऊन विश्रांती घेण्याची व्यवस्था केली. काही काळानंतर विश्रांती घेतली आणि पुन्हा कोलू चालवण्यासाठी आलो पण पाय जडावले होते यामुळे काम थांबवले. यातून तेल निघण्यासाठी पांढरे नव्हे तर लाल शेंगदाणे वापरावे लागतात, असे तेथे आलेल्या एका तेल घाण्याच्या व्यावसायिकाने सांगितल्याने मी पांढरे शेंगदाणे टाकून जो प्रयत्न केला त्यातून आणखी वेळ जाणार हे नक्की झाले. मात्र त्यानंतर काही आपल्याला कोलू ओढवला नाही, असे सांगत प्रमोद नाईक यांनी तात्याराव सावरकर यांनी अंदमानात किती भीषण व भयावह त्रास सहन केला असेल, त्याची कल्पना करणेही कठीण असल्याचे स्पष्ट केले.

कोण आहेत प्रमोद नाईक?

प्रमोद नाईक हे मूळचे मध्य प्रदेशातील असून ते इलेक्ट्रीकल इंजिनीअर आहेत. टाटा पॉवरमध्ये त्यांनी १९७५ ते २०१० या कालावधीत काम केले, तेथे वरिष्ठ अभियंता म्हणून ते निवृत्त झाले. कोलू ओढण्याच्या त्यांच्या या प्रयोगाच्यावेळी स्मारकात येणाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा केली, त्यांचे अनुभवही ऐकले. मी सावरकर स्मारकात विविध कार्यक्रम पाहाण्यासाठी येत असोत, तेव्हा स्मारकात असलेला हा कोलू एकदा फिरवून पाहिला होता. त्यावेळी हा प्रयोग करून तात्याराव सावरकरांना आलेला अनुभव आपणही किती घेऊ शकतो, ते पाहवे, यासाठी मी आज येथे आलो असे प्रमोद नाईक यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.