शेतकऱ्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी! एल-निनोमुळे सतर्कतेचा इशारा, मान्सूनबाबत स्कायमेटने जारी केला अहवाल

96

देशभरात सातत्याने हवामान बदल होत असून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. स्कायमेट या खासगी संस्थेने आपला मान्सूनबाबतचा अंदाज ट्वीट करत सादर केला आहे. यंदा सामान्यपेक्षा कमी म्हणजेच ९४ टक्के पावसाचा अंदाज स्कायमेट या संस्थेने वर्तवला आहे. तसेच जून ते सप्टेंबर या कालावधीत ८५८.६ मिमी सरासरी पाऊस पडण्याची शक्यता आहे असे स्कायमेटने स्पष्ट केले आहे.

( हेही वाचा : कोकण रेल्वे सुसाट! उन्हाळ्यात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी जादा गाड्या )

शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले 

गेली ४ वर्ष देशभरात ला-निनाच्या प्रभावाने अपेक्षेपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली होती. परंतु आता ला-निना प्रवाह संपुष्टात आला असून एल-निनोचा प्रभाव वाढत आहे. अर्थात एल-निनोमुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते म्हणूनच स्कायमेटकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

देशात उत्तर आणि मध्य भारतात पावसाची कमतरता प्रकर्षाने जाणवेल. गुजरात, मध्य-प्रदेश आणि महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्ट या मुख्य मान्सूनच्या कालावधीत अपेक्षेपेक्षा कमी पाऊस पडेल. तसेच पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्येही सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तवली आहे.

स्कायमेटचा प्राथमिक अंदाज 

स्कायमेट संस्थेचा हा प्राथमिक अंदाज असून यामुळे देशभरातील शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. परंतु ही संस्था पुन्हा एकदा आपला अंदाज व्यक्त करणार आहे. त्यामुळे पुढच्या अंदाजात मान्सूनचे आणखी चित्र स्पष्ट होईल असे स्कायमेटने म्हटले आहे.

https://twitter.com/SkymetWeather/status/1645304133761617921

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.