वानखेडेच्या खेळपट्टीप्रमाणे शिवाजी पार्कची काळजी घेण्याचे एमसीएला आवाहन! खासदार शेवाळे यांनी करून दिली जाणीव

188

छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात(शिवाजी पार्क) मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या(एमसीए) वतीनेही अनेक सामने खेळवले जातात, त्यांच्याकडूनही पार्काचा वापर केला जातो, त्यामुळे शिवाजी पार्क च्या देखभालीची जबाबदारी ‘एमसीए’ घ्यावी. वानखेडे मैदानाची जशी काळजी घेतली जाते तशी या शिवाजी पार्कची घेतली जावी. एमसीए कडे तज्ज्ञ मंडळी असून त्यांनी वानखेडे प्रमाणे शिवाजी पार्क मैदानाची देखभाल करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन दक्षिण मध्य मुंबईचे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केले आहे.

दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क) येथील लाल मातीच्या धुळीमुळे गेल्या काही काळापासून आजूबाजूच्या परिसरात प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. तसेच याठिकाणी कायदा – सुव्यवस्था, फेरीवाले, पार्किंग अशा अनेक समस्यांचा स्थानिकांना सामना करावा लागत आहे. यावर सकारात्मक चर्चा करून तोडगा काढण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांच्या वतीने शिवाजी पार्क जिमखाना येथे ‘ थेट संवाद ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला खासदार शेवाळे यांच्यासह, आमदार सदा सरवणकर, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर, मनसे नेते संदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त मनोज पाटील, अतिरिक्त पोलिस आयुक्त काकडे, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे तानाजी यादव, पालिका उपायुक्त ( पर्यावरण) अतुल पाटील, उपायुक्त रमाकांत बिरादर, सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे, पालिकेचे माजी सल्लागार नंदन मुणगेकर यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

माती काढून टाका! त्या कंत्राटदारावर कारवाई करा

या कार्यक्रमात बोलतांना राहुल शेवाळे यांनी, सुमारे तीन वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे अशास्त्रीय पद्धतीने टाकलेली अतिरिक्त माती काढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने त्वरित कामाला सुरुवात करावी, अशी सूचना पालिका प्रशासनाला केली. तसेच सुमारे तीन वर्षांपूर्वी शिवाजी पार्क मध्ये कोणत्याही शास्त्रीय अभ्यासाशिवाय अतिरिक्त माती टाकणाऱ्या कत्रांटदारांविरोधात कारवाई करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.

माजी सल्लागार मुणगेकर यांना पुन्हा सल्लागार म्हणून नेमा!

यावेळी पालिकेचे माजी सल्लागार नंदन मुणगेकर यांनी तीन वर्षांपूर्वी अशास्त्रीय पद्धतीने मैदानात टाकलेल्या मातिविषयी पूर्ण माहिती दिली. त्यांनतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी, माजी सल्लागार मुणगेकर यांना पुन्हा सल्लागार म्हणून नेमण्याचा प्रस्ताव, सर्व नागरिकांच्या वतीने मांडला. आणि त्याला सर्व मान्यवरांनी अनुमोदन दिले. तसेच मुणगेकर यांच्या सल्ल्याने अतिरिक्त माती काढण्यासाठी त्वरित कारवाई सुरू करावी, अशी सूचना खासदार शेवाळे यांनी पालिकेला दिली.

शिवाजीपार्क जनतेने याही समस्यांवर वेधले लक्ष

या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या नागरिकांनी धुळीचे प्रदूषण, शिवाजी पार्क परिसरातील फेरीवाले, बेकायदा पार्किंग, महिलांसाठी सार्वजनिक टॉयलेट, पार्कातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर रोषणाई, संपूर्ण परिसरात सी सी टी व्ही, नव्या बांधकामामुळे होणारी झाडांची कत्तल, कायदा – सुव्यवस्थेची समस्या, पाळीव कुत्र्यांच्या उघड्यावरील शौचाची समस्या अशा अनेक विषयांवर आपली मते मान्यवरांच्या समोर मांडली. या सर्व समस्यांची दखल घेत त्यावर त्वरित उपाययोजना करण्याची ग्वाही यावेळी खासदारांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.