पूजा चव्हाण आणि मनसुख हिरेन प्रकरणातील शवविच्छेदन अहवालात छेडछाड?

राठोड प्रकरणातील ऑडिओ क्लीप ज्या सांताक्रुझ येथील फॉरेन्सीक लॅबमध्ये पाठवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये छेडछाड सुरु आहे की काय? असा सवाल शेलार यांनी केला आहे.

177

पूजा चव्हाण प्रकरणातील ज्या ऑडिओ क्लिप सांताक्रुज येथील फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आल्या त्यामध्ये छेडछाड करण्यात येते की काय, तसेच मनसुख हिरेन यांच्या शवविच्छेदन अहवालात ही छेडछाड केली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन तातडीने या पुराव्यांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासणी करा, अशी मागणी भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी आज केली.

हेराफेरी चालू आहे का?

ठाकरे सरकारची हेराफेरी अजूनही सुरुच आहे. रोज नवीन हेराफेरी या ठाकरे सरकारच्या काळात सुरू आहेत. एका गुन्ह्याला लपवण्यासाठी दुसरा गुन्हा केला जातोय. पूजा चव्हाण या भगिनीच्या आत्महत्या, हत्येप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला. त्यानंतर सचिन वाझे प्रकरण उघड झाले. त्याचा फायदा घेत राठोड प्रकरणातील ऑडिओ क्लीप ज्या सांताक्रुझ येथील फॉरेन्सीक लॅबमध्ये पाठवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये छेडछाड सुरु आहे की काय? तो आवाज संजय राठोड यांचा नाहीच, असा अहवाल तयार करण्यासाठी पोलिस यंत्रणेमार्फत छेडछाड होण्याची शक्यता आहे.

(हेही वाचाः वाझेंसाठी बैठका घेणारे मुख्यमंत्री, जनतेच्या प्रश्नांसाठी बैठका कधी घेणार?- संजय कुटे)

स्वतंत्र यंत्रणेमार्फत पुरावे तपासण्याची गरज

तसेच मनसुख हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल तसेच शवविच्छेदन करतानाचे रेकॉर्डिंग पोलिसांना पुर्णपणे देण्यात आलेले नाही. त्यामध्ये सुध्दा छेडछाड केली जात आहे की काय? अशी शंका आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणी स्वतंत्र यंत्रणेमार्फत या पुराव्यांची तपासणी होण्याची गरज आहे, असे आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

हाच का किमान समान कार्यक्रम?

काल एनआयएने ताब्यात घेतलेल्या मर्सिडीज गाडीत पाच लाख रुपये रोख तसेच नोटा मोजण्याचे मशिन सापडले. त्यामुळे या मुद्द्यावरुन सुद्धा आशिष शेलार यांनी सरकारला प्रश्न विचारला आहे. एका पोलिस अधिकाऱ्याच्या गाडीत सापडलेल्या नोटा तसेच, पैसे मोजण्याचे मशीन हाच का तो आघाडी सरकारचा “किमान समान कार्यक्रम” आहे का? असा टोलाही आशिष शेलार यांनी लगावला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.