वाढत्या प्रदूषणाला आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकार गेल्या काही काळात विशेष प्रयत्न करत आहे. यासाठी देशभरात नानाविध महामार्ग, विमानतळांची बांधणी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नवीन घोषणा केली आहे. १३ एप्रिलला बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी मुलाखत दिली. यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी सरकार नानाविध उपाययोजना राबवत आहे. यानुसार आता सरकारने पंचतारांकित बस टर्मिनस उभारण्याचे धोरण तयार केले आहे.
खर्च कोणाच्या खिशातून?
पंचतारांकित टर्मिनस बांधण्याचा खर्च राज्य सरकारला करावा लागणार नाही. केंद्र सरकार गुंतवणूक करायला तयार आहे. फक्त त्यासाठी आवश्यक जागा राज्य सरकारने मिळवून द्यावी असे यावेळी गडकरी म्हणाले.
गोव्याचा नंबर पहिला?
पंचतारांकित बस टर्मिनसच्या बांधणी संबंधित केंद्राचे धोरण अजूनही निश्चित झालेले नाही. मात्र गोव्यातून आताच अशा प्रकारचे नऊ पंचतारांकित बस टर्मिनस बांधण्याचे प्रस्ताव आलेले आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारने याविषयी अद्याप प्रस्ताव दिलेला नाही.
बहुउद्देशीय दळणवळण सेवा केंद्र
भारतातील नानाविध शहरांमध्ये बहुउद्देशीय दळणवळण सेवा केंद्र उभारण्यात येणार आहेत. ७० कोटी मॅट्रीक टनाची आयात – निर्यात या केंद्रांमुळे होण्याचा दावा गडकरींनी मुलाखतीत केला आहे. देशभरात अशा प्रकारची एकूण ३५ केंद्र उभारण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च दोन लाख कोटींच्या घरात आहे. जालना आणि वर्धा येथील दळणवळण सेवा केंद्राच बांधकाम पूर्ण झाले आहे. येत्या काळात या शहरांमध्ये बहुउद्देशीय दळणवळण सेवा केंद्र बांधण्यात येतील .
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- हैद्राबाद
- दिल्ली
- वाराणसी
मुंबईसाठी अजून काय?
- दिल्ली मुंबई महामार्गतील विरार – वांद्रे सागरी सेतूने जोडणार
- १२०० कोटी खर्च करून पनवेलमधली वाहतूक कोंडी सोडवणार
- १०,००० कोटी खर्च करून नवी मुंबई विमानतळाला महामार्गाशी जोडणार