जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण अग्निसुरक्षा देखील कशाप्रकारे जलद करू शकतो, याचाही विचार करायला हवा. त्यादृष्टीने अग्निशमन दल तांत्रिकदृष्टया अधिकाधिक सुसज्ज करण्यासाठी प्रयत्न करुया. यासाठी इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून उंच इमारतींमध्ये लावलेली उपकरणे, यंत्रणा योग्यप्रकारे काम करीत आहे किंवा नाही हे तपासता येवू शकते. केंद्र शासनाच्या योजना, १५व्या वित्त आयोगातूनही त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांनी नमूद केले.
मुंबई महानगर महानगराच्या विस्तारासाठी जितक्या नैसर्गिक मर्यादा आहेत, तितकीच आव्हानेदेखील आहेत. दाटीवाटीच्या वस्तीत असलेली लोकसंख्या, वाढत्या गगनचुंबी इमारती, रासायनिक प्रक्रिया करणारे उदयोग-व्यवसाय यामुळे मुंबईत अनेकदा आपत्कालीन परिस्थिती उद्भवते. मात्र अशा आव्हानांनाही तोंड देण्यासाठी मुंबई अग्निशमन दल सदैव सज्ज आहे. येत्या काळातही अत्याधुनिक यंत्रणा, साहित्य आणि उपकरणांसह मुंबई अग्निशमन दल अधिक सक्षमपणे मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी सुसज्ज असेल, अशी ग्वाही आश्विनी भिडे यांनी दिली. अग्निसुरक्षेबाबत जनजागृतीदेखील तितकीच महत्त्वाची आहे. कारण जोपर्यंत प्रतिबंधात्मक उपाय आपण करीत नाही तोपर्यंत आग दुर्घटनेचा धोका कायम राहणार आहे. आपल्या जवानांची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची आहे,असे त्या म्हणाल्या.
महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालक एस. एस. वारीक, मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर यांच्यासह अग्निशमन दलाचे सेवानिवृत्त अधिकारी व इतर मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
लहान मुलांमध्ये अग्निसुरक्षेबाबत जाणीव जागृती व्हावी
घराची अंतर्गत सजावट करताना कोणकोणत्या बाबींचा विचार करावा, याचा समावेश जर अभियांत्रिकी, वास्तूशास्त्र अभ्यासक्रमात केला, काही विशेष पदविका अभ्यासक्रम सुरू केले तर येणाऱ्या या पिढीला आपण अग्निप्रतिबंधात्मक उपायांबाबत सुशिक्षित करू शकतो. लहान मुलांमध्येही अग्निसुरक्षेबाबत जाणीव जागृती व्हावी, यासाठी शाळांमध्ये लघूपट दाखविणे, माहितीपत्रके वितरित करणे, असे उपक्रम राबवता येवू शकतात, असेही भिडे यांनी सांगितले.
समाज जागरुक झाला तरच…
केवळ अग्निशमन सेवा सप्ताहातच नागरिकांना अग्निशमन कार्यालयात न बोलावता इतरवेळीदेखील बोलावून त्यांचे प्रबोधन करायला हवे. आपल्यासाठी अग्निशमन कार्यापलीकडे दल नेमके काय कामकाज करतो, याची सुसज्जता कशी आहे, नागरिकांचे कोणते सहकार्य त्यांना अपेक्षित आहे, याबाबत येत्या काळात उपक्रम राबवायला हवा. कारण जितका समाज जागरूक होईल तितक्या प्रमाणात आगीच्या घटना कमी होवू शकतात, असा विश्वासही भिडे यांनी व्यक्त केला.
प्रमुख अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर यांनी प्रास्ताविक केले. मुंबई अग्निशमन दलाचे उपक्रम, अग्निरक्षक कार्यक्रम, अग्निशमन सेवा सप्ताहाचे आयोजन, त्यातून मुंबईकरांसाठी “अग्निशमन दल जाणून घ्या” अभियान आदींविषयी मांजरेकर यांनी माहिती दिली. महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालक संतोष वारीक यांनी महाराष्ट्र अग्निशमन कायदा, अग्निसुरक्षा अभियान याबाबत माहिती दिली. ग्रामीण भागापर्यंत अग्निशमन सेवा कशी पोहोचू शकते, त्यासाठी महाराष्ट्र शासन कोणकोणत्या उपाययोजना करीत आहे, याची देखील त्यांनी माहिती दिली.
राज्यपालांच्या हस्ते १२अधिकारी, जवानांना पदके प्रदान
राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मुंबई फायर ब्रिगेड तसेच राज्य अग्निशमन सेवेतील १३ अधिकाऱ्यांना व जवानांना ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदके’ प्रदान करण्यात आली, तसेच अग्निशमन कर्मचारी कल्याण निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. मुंबईसारख्या शहरांमध्ये आगीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी शाळांना तसेच गृहनिर्माण संस्थांना सहभागी केले पाहिजे तसेच गृहनिर्माण संस्था व उद्योग संस्थांचे नियमित ‘फायर ऑडिट’ केले गेले पाहिजे असेही राज्यपालांनी सांगितले.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर यांच्यासह देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी, पुणे महानगर पालिका, प्रशांत रणपिसे, माजी मुख्य अग्निशमन अधिकारी, पुणे महानगरपालिका, किरण गावडे, माजी मुख्य अग्निशमन अधिकारी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, यशवंत जाधव, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, मुंबई अग्निशमन दल, कैलास हिवराळे, माजी उपमुख्य अग्निशमन अधिकारी मुंबई अग्निशमन दल, विजयकुमार पाणिग्रही, माजी उपमुख्य अग्निशमन अधिकारी, मुंबई अग्निशमन दल, संजय पवार, प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी, मालेगाव महानगरपालिका, नाशिक, धर्मराज नाकोड,सहायक स्टेशन अधिकारी, नागपूर महानगरपालिका, राजाराम केदारी, लिडिंग फायरमन, पुणे महानगरपालिका, सुरेश पाटील, लिडिंग फायरमन, मुंबई अग्निशमन दल, संजय म्हामुणकर, लिडिंग फायरमन मुंबई फायर ब्रिगेड व चंद्रकांत आनंददास, फायरमन, पुणे महानगरपालिका यांचा ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’ देऊन सत्कार करण्यात आला.
(हेही वाचा – वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास: आदित्य ठाकरेंनी ‘यांना’ म्हटले समाजकंटक)
Join Our WhatsApp Community