माजी शिक्षणमंत्री आणि कॉंग्रेसच्या धारावीतील आमदार वर्षा गायकवाड यांना भाजपाने गळ टाकण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे. कॉंग्रेसमधून पंख छाटण्यास सुरुवात झाल्याने त्या वेगळी वाट निवडण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे भाजपाकडून त्यांना ऑफर देण्यात आल्याची माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली.
महाराष्ट्र काँग्रेसने नुकतीच निवडणूक समन्वय समितीची स्थापना केली. १७ सदस्यांच्या या समितीत नाना पटोले, बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, सतेज पाटील, नसीम खान, बसवराज पाटील, प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, अमरजित मनहास, अतुल लोंढे, संध्या सव्वालाखे, देवानंद पवार आणि प्रमोद मोरे यांचा समावेश आहे. मात्र, मुंबईतील प्रमुख चेहरा असलेल्या वर्षा गायकवाड यांना संधी देण्यात आलेली नाही.
शिवाय कर्नाटक विधानसभेच्या प्रचारासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने नेमलेल्या नेत्यांमधूनही गायकवाड यांचे नाव वगळण्यात आले आहे. याबद्दल त्यांनी पक्ष नेतृत्त्वाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भाजपाने ही संधी हेरत गायकवाड यांच्या दुःखावर फुंकर घालतानाच, आपला गळ टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यांची धारावीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. वर्षा गायकवाड गळाला लागल्यास हा मतदारसंघ ताब्यात येऊ शकतो, असा विश्वास भाजपाला आहे.
(हेही वाचा तेव्हा भगतसिंगांनीही ब्रिटिशांकडे सुटकेसाठी केले होते आवेदन; पुस्तकातून केला दावा )
सायनमधून कोण?
- समीश्र वस्तीचा मतदारसंघ असलेल्या धारावीत दाक्षिणात्य मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्या विरोधात तमिल सेल्वन यांना उतरवण्याची तयारी भाजपाकडून सुरू होती. धारावीचा पुनर्विकास हा भाजपासाठी मैलाचा दगड होता. मात्र, अदानी प्रकरणानंतर या प्रकल्पाभोवतीही संशयाचे वारे घोंगावू लागल्यामुळे भाजपाने एक पाऊल मागे घेत थेट वर्षा गायकवाड यांना गळ घालण्यास सुरुवात केली आहे.
- तमिल सेल्वन यांनी धारावीतून माघार घेतली असली, तरी त्यांच्या विद्यमान सायन-कोळीवाडा मतदारसंघात त्यांच्यापुढे स्वपक्षातूनच आव्हान उभे ठाकले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेल्या प्रसाद लाड यांनी दोन वर्षांपासून येथून तयारी सुरू केली आहे. सेल्वन धारावीतून, तर लाड सायनमधून अशी भाजपाची रणनीती होती. मात्र, गायकवाड भाजपात आल्यास सायनमधून नेमकी कोणाला संधी मिळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.