जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शनिवारी पहाटे झालेल्या खासगी बसच्या अपघातात सुमारे ११ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ खासगी बस दरीत कोसळून हा अपघात झाला आहे. या दुर्घटनेत सुमारे २८ जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
( हेही वाचा : रविवारी बाहेर पडताय? ‘या’ मार्गावर असणार मेगाब्लॉक )
जखमींना खोपोली येथील ग्रामीण रुग्णालयात केले दाखल
यासंदर्भातील माहितीनुसार मुंबईच्या गोरेगाव येथील बाजीप्रभू गट (झांज पथक) पुण्यातील कार्यक्रम आटोपून मुंबईच्या दिशेने परतत होते. या बसमध्ये सुमारे ४० ते ४५ प्रवासी होते. ही बस बोरघाटातून जात असताना चालकाचा ताबा सुटून ही बस दरीत कोसळली. या घटनेत सुमारे ११ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. आतापर्यंत २५ जखमींना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींना खोपोली येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असून, घटनास्थळी हायकर्स ग्रुप, खासगी डॉक्टर्स आणि आरआरबी टीम मदतीसाठी दाखल झाली आहे.
आणखी काही प्रवासी बसमध्ये अडकलेले असल्याची शक्यता वर्तवली जात असून सध्या युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू आहे. लोणावळ्याजवळ असलेल्या बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.
Join Our WhatsApp Community