“या गोष्टी त्वरित थांबवा…अन्यथा करणार कायदेशीर कारवाई”, व्हायरल व्हिडिओप्रकरणी खासदार राहुल शेवाळेंनी दिला इशारा

207

शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला. गुरुवारी रात्री बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी गेले असता तिथल्या लोकांनी त्यांना विरोध केला असे दाखवण्याचा या व्हिडिओतून प्रयत्न करण्यात आला परंतु याबाबत आता खासदार राहुल शेवाळेंनी माध्यमांसमोर आपली भूमिका आता स्पष्ट केली आहे.

( हेही वाचा : मुंबई-पुणे महामार्ग अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत, जखमींवर होणार शासकीय खर्चाने उपचार )

काय म्हणाले राहुल शेवाळे?

राहुल शेवाळे म्हणारे, कोणत्याही विषयावर खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करण्याची चढाओढ सध्या सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून एका व्हिडिओसह माझ्याविषयी गैरसमज पसरवणारी माहिती समाज माध्यमांवर पोस्ट केली जात आहे असा आरोप शेवाळेंनी विरोधकांवर केला आहे. ते म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त देशभरात आनंदाचं वातावरण होतं. मुंबईत देखील गेल्या दोन वर्षांच्या कोविड संकटानंतर जागोजागी मोठ्या दिमाखात जयंती साजरी झाली. मी स्वतः देखील चैत्यभूमी आणि अनेक मंडळाच्या कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात दिवसभर व्यस्त होतो. जयंतीच्या मंगलमय वातावरणाला गालबोट लागायला नको, म्हणून मी शांत होतो. पण हा गैरसमज वाढायला नको, म्हणून राहुल शेवाळेंनी आपली भूमिका स्पष्ट करत असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे शेवाळे म्हणाले, चेंबूरच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोर माझ्या पाठपुराव्याने आणि माझ्याच खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या अशोक स्तंभाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माननीय केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या शुभहस्ते अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवारी रात्री अकरा वाजता करण्यात आले. त्यानंतर या सर्व मान्यवरांसह मी देखील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करून अभिवादन केले होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

रात्री बारा वाजता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी ज्या ट्रॉलीची व्यवस्था करण्यात आली होती, त्या ट्रॉली मध्ये माझ्यासह माजी मंत्री चंद्रकांतजी हांडोरे, आमदार प्रकाश फातर्फेकर आणि ट्रॉली ऑपरेटर उभे होते. त्यावेळी सुजात आंबेडकर यांच्या समर्थकांनी त्यांना आणि अमन आंबेडकर यांना ट्रॉली मध्ये घेण्यासाठी आग्रह धरला. ट्रॉलीमध्ये माणसांची संख्या मर्यादित ठेवावी लागते, अन्यथा दुर्घटना होऊ शकते. त्यावेळी ट्रॉलीमधून बाहेर पडावे की नाही, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न होता. पण आंबेडकरांचे वंशज जर अभिवादन करण्यासाठी ट्रॉलीमध्ये येत असतील, तर त्यात काय गैर? असा विचार मी केला. त्यावेळी मी सुजात आंबेडकर यांना ट्रॉलीमध्ये येण्यासाठी सांगितले आणि माझ्या सद्सदविवेकबुद्धीला स्मरून मी स्वतः हून ट्रॉली मधून खाली उतरलो. कोणीही मला खाली उतरण्यास सांगितले नव्हते. पण मी स्थानिक लोकप्रतिनिधी असूनही स्वतः हून एक पाऊल मागे येत ट्रॉली मधून खाली उतरलो. असे स्पष्टीकरण व्हायरल व्हिडिओ प्रकरणी खासदार राहुल शेवाळेंनी दिले आहे.

राहुल शेवाळेंनी दिला इशारा 

यावेळी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी राहुल शेवलांच्या कृतीला दाद देऊन आदर व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. असाच प्रकार याआधी देखील झाला होता. तेव्हासुद्धा मी त्यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांना पुढे जायला सांगून ट्रॉलीमधून उतरलो होतो. पण तेव्हा असा गैरसमज पसरवला गेला नव्हता. पण यावेळी केवळ राजकीय सुड बुध्दीने व्हिडिओ सोबत चुकीचा मजकूर जोडून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न काही जणांनी केला आहे असे म्हणत राहुल शेवाळेंनी सर्वांना विनंती केली आहे की, हा विषय राजकारणाचा नाही. तुम्ही केवळ गैरसमज पसरवत नसून आंबेडकरी जनतेच्या भावनांचा अनादर करत आहात. शेवटी इतकच सांगेन की तुमच्या या घाणेरड्या राजकारणामुळे माझ्यासारखा आंबेडकरी अनुयायी बिलकुल डगमगणार नाही जय भीम! तेव्हा या गोष्टी त्वरित थांबवा. अन्यथा कायदेशीर कारवाईसाठी तयार रहा असा इशारा सुद्धा राहुल शेवाळेंनी दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.