केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील काही भागात पंतगबाजी करणे, ड्रोन उडवणे यांच्यावर मुंबई पोलिसांकडून बंदी आणण्यात आली आहे. ही बंदी दोन दिवसांसाठी असणार असल्याचा आदेश मुंबई पोलिसांकडून जारी करण्यात आला आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.
( हेही वाचा : दादरमध्ये जमालची कमाल, फेरीवाले जोमात : भाजप कोमात! )
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे १५ एप्रिल ते १६ एप्रिल २०२३ रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याच्यावेळी दहशतवादी, समाजविरोधी घटकांकडून ड्रोन, पॅरा ग्लायडर, रिमोट कंट्रोल मायक्रोलाईट एअरक्राफ्टचा वापर करत हल्ला करून मानवी जीवन, आरोग्य, सुरक्षितता आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊन गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याची भीती मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशातून व्यक्ती केली आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून विमान तळ, सहार, कुलाबा, विलेपार्ले, खेरवाडी, वाकोला, सांताक्रूझ, वांद्रे, वरळी, गांवदेवी, डि.बी.मार्ग, मरिन ड्राईव्ह, कफ परेड आणि मलबार हिल पोलीस ठाणे यांच्या हद्दीत पंतगबाजी करणे, ड्रोन, पॅरा ग्लायडर, सर्व प्रकारची फुगे, रिमोट कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्टवर दोन दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे. मुंबई पोलिसांकडून याप्रकरणी आदेश जारी करण्यात आलेला असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community