आप्पासाहेब धर्माधिकारी यांना अमित शहांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान

93

नवी मुंबईच्या खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर महाराष्ट्र भूषण सोहळा संपन्न होत आहे. महाराष्ट्र भूषण हा राज्य शासनाच्यावतीनं देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण २०२२ ने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आप्पासाहेब यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी खारघर येथे जवळपास २० लाखांपेक्षा अधिक अप्पासाहेबांच्या अनुयायांनी हजेरी लावली आहे. त्याचसोबत अनेक मान्यवर व्यक्ती देखील तिथे उपस्थित आहेत.

(हेही वाचा –महाराष्ट्र भूषण सोहळा २०२२ : आप्पासाहेब मन स्वच्छ करतात – सुधीर मुनगंटीवार

“या सोहळ्याची इतिहासात नोंद घेतली जाईल, ना भूतो न भविष्यती असा हा कार्यक्रम होईल,” असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला होता. त्याचप्रमाणे या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. पुरस्कार देतांना डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्याची एक ध्वनिफित यावेळी दाखवण्यात आली. यावेळी त्यांनी राबवलेल्या स्वच्छता अभियाने, मंदिरांचे तलाव, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन अशा अनेक कामांचं कौतुक करण्यात आलं. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेले रक्तदान शिबिराचे कौतुक करण्यात आले.

या सोहळ्यादरम्यान, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली.

सोहळ्याच्या ठिकाणी सुमारे २५० टॅंकर आणि २१०० नळ बसविण्यात आले आहेत. वैद्यकीय सुविधा देखील तैनात करण्यात आली असून ६९ रुग्णावाहिका, ३५० डॉक्टर्स, १०० नर्स आणि कर्मचारी कार्यरत आहेत. ३२ फिरते शौचालय, ४२०० पोर्टेबल शौचालय, कार्यक्रमस्थळी ९००० तात्पुरते शौचालय बांधण्यात आली आहेत. स्वच्छता व्यवस्थेसाठी ६० जेटींग मशीन, ४००० सफाई कर्मचारी शिवाय २६ अग्निशमन वाहने उपलब्ध आहेत. पार्कींगसाठी २२ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी ६०० स्वयंसेवक, २०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.