उध्वस्त कुटुंबांना वाचवण्याचं, दिशा देण्याचं काम आप्पासाहेबांनी केलं – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

107

ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण २०२२ ने सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे ?

ज्यावेळेस माझ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता त्यावेळी माझं कुटुंब उध्वस्त झालं होतं. तेव्हा मला ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे यांनी आधार दिला आणि आप्पासाहेबांनी माझ्या संपूर्ण कुटुंबाला पुन्हा या समाजाची सेवा करण्यासाठी मार्गदर्शन केलं, दिशा दाखवली आणि म्हणूनच मी तुमच्यासमोर आज मुख्यमंत्री नाही तर एक श्री सदस्य म्हणून उभा आहे. त्यामध्ये आप्पासाहेबांचे मोठे योगदान आहे.

धर्माधिकारी कुटुंबिय राज्यात गेल्या तीनशे चारशे वर्षांपासून लोकांना दिशा देण्याचे काम करत असून ज्ञानाच्या ज्योती घराघरात लावण्यासाठी या परिवाराचे मोठे योगदान आहे. उध्वस्त कुटुंबांना सावरण्याचं काम नानासाहेब, आप्पासाहेबा धर्माधिकारी यांनी केलं असून आता सचिनदादा धर्माधिकारी हा वारसा पुढे नेत आहेत. माणसं घडविण्याचं विद्यापीठ म्हणजे रेवदंडा असल्याचे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केलं आहे. या सोहळ्याला मी एक श्री सदस्य म्हणून उपस्थित असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी उपस्थित जनसागराला अभिवादन केले.

(हेही वाचा –महाराष्ट्र भूषण सोहळा २०२२ : आप्पासाहेब मन स्वच्छ करतात – सुधीर मुनगंटीवार

‘पाहिला जनांचा सागर भरली ज्ञानाची घागर’ असे सांगत जनांचा महासागर या ठिकाणी लोटलेला आहे. खरं म्हणजे सूर्य पूर्ण ताकदीने आग ओकतोय आणि याठिकाणी सकाळपासून भर उन्हामध्ये बसलेला एकही माणूस उठत नाही ही खरी आप्पासाहेबांची ताकद आहे. प्रत्येक श्री सदस्य शिस्तीचे पालन करत असतो आणि मला या ठिकाणी सांगावसं वाटतं की माझी पत्नी आणि मुलगा खासदार डॉ. श्रीकांत देखील या श्री सदस्यांमध्ये समोर बसलेले आहेत. हा जनसागर आप्पासाहेबांच्या प्रेमापोटी परवा रात्रीपासून याठिकाणी उपस्थित आहे.

राजकीय सत्तेपेक्षा अध्यात्मिक शक्ती मोठी असते त्याचे स्वरूप या ठिकाणी आपण पाहतोय. ही गर्दी सगळे रेकॉर्ड मोडणारी असून हा रेकॉर्ड श्री सदस्यच मोडू शकतात. या अथांग जनसागरामध्ये आप्पासाहेबांच्या रूपाने देव दिसतोय. नानासाहेबांना देखील महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला होता पण त्यांच्या निधनानंतर याच मैदानामध्ये आप्पासाहेबांनी तो स्वीकारला होता आणि त्याच मैदानामध्ये आज पुन्हा २०२२ चा महाराष्ट्र भूषण आप्पासाहेबांना देण्यात आला हा योगायोग आहे.

अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, हुंडा यासारख्या अनिष्ट प्रथा दूर करण्याचे काम नानासाहेबांनी, आप्पासाहेबांनी केलं. मोह, माया, मत्सर याच्यापासून आपण दूर कसं जाऊ याची शिकवण आप्पासाहेबांनी दिली. सरकार म्हणून काम करीत असताना आम्ही देखील आप्पासाहेबांचे विचार आचरणात आणून सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करतोय. ठिपक्या ठिपक्यांनी रांगोळी तयार होते तसे माणसं जोडून माणुसकीचा महासागर आप्पासाहेबांनी निर्माण केला आहे. अरे माणसा माणसा कधी व्हशील माणूस तू.. या बहिणाबाईंना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आप्पासाहेबांच्या माणूस घडविण्याच्या याच कार्यातून मिळते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.