महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च पुरस्कार समजला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार रविवार १६ एप्रिल रोजी निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केद्रींय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते दिला गेला. यामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची उंची वाढली आहे. नवी मुंबई येथील खारघरच्या सेंट्रल पार्क येथे हा सोहळा संपन्न झाला.
(हेही वाचा –उध्वस्त कुटुंबांना वाचवण्याचं, दिशा देण्याचं काम आप्पासाहेबांनी केलं – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)
आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणजेच दत्तात्रेय नारायण, हे एक समाजसेवक आहेत. नाना धर्माधिकारींच्या पावलावर पाऊल टाकत, आप्पासाहेब महाराष्ट्रात अनेक वृक्षारोपन, रक्तदान शिबीर, निशुल्क वैद्यकीय शिबीर, रोजगार मेळावे, स्वच्छता मोहिम, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती केंद्र इत्यादी कार्यक्रमांच्या आयोजनास कारणीभूत ठरले. २०१४ मध्ये डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, नेरुळने त्यांना विद्यालंकार ही मानद पदवी देऊन सन्मानित केले. तर २०१७ मध्ये त्यांना चौथा सर्वोच्च भारतीय नागरी सन्मान असणाऱ्या पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र भूषण सोहळ्यासाठी सेंट्रल पार्कच का ?
नवी मुंबई येथील खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानात हा सोहळा संपन्न झाला. हे मैदान तब्ब्ल ४०० एकरमध्ये पसरलेले आहे. यापूर्वी देखील अनेक मोठे सोहळे इथे झाले आहे. महाराष्ट्र भूषण सोहळ्यासाठी एकूण ३०० एकर परिसराची जागा वापरण्यात आली. पार्किंग आणि शौचालय यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली होती.
२००८ साली नानासाहेब धर्माधिकारी यांनाही याच मैदानावर महाराष्ट्र भूषण देण्यात आला होता, मात्र तेव्हा हा पुरस्कार त्यांचे पुत्र म्हणजेच आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी स्विकारला होता. त्यामुळेच मुख्मंत्री एकनाथ शिंदे यांनी या मैदानाची निवड केली असल्याचे सांगितले जाते. तसेच या सोहळ्याला २० लाख श्री सदस्य आपली उपस्थिती लावणार असल्याने जागेच्या दृष्टीने देखील सेंट्रल पार्कची निवड करण्यात आली.
Join Our WhatsApp Community