उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच नागपूरमध्ये महाविकास आघाडीची दुसरी वज्रमूठ सभा रविवारी आयोजित करण्यात आली आहे. पहिली वज्रमूठ सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली होती. त्यानंतर रविवारी नागपूरमध्ये ही सभा होणार असून या सभेत सहा नेत्यांची भाषणे होणार आहेत. दरम्यान मविआच्या या वज्रमूठ सभेवर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून टीका केली जात आहे. ही सभा सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि स्वार्थासाठी होत असल्याची टीका भाजप नेते, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
तसेच शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के म्हणाले की, ‘मविआच्या नेत्यांमध्ये खुर्चीवरून सध्या भांडणं सुरू आहेत. उद्धव ठाकरे म्हणतात वीर सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. आणि वड्डेटीवार यांची मुलगी वीर सावकरांवर टीका करते. ही कसली सभा? तिकडे अजित पवार नाराज आहेत. ते येणार की नाही याबद्दल संजय राऊत मुलाखती देत आहेत. अजित पवार इतर पक्षात जाणार नाही, याची शक्यता वर्तवली जाते आहे. त्यामुळे ही कसली सभा? या सभेला काही अर्थ नाहीये. वेगवेगळ्या विचारांचे खुर्चीवरून भांडत आहेत. छोटी खुर्ची की मोठी खुर्ची.’
दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गैरहजर होते, पण ते नागपुरातील सभेला हजर राहणार आहेत. तसेच या रविवारच्या सभेला अजित पवारांच्या उपस्थितीकडे सर्वांचे विशेष लक्ष लागून राहिले आहे. अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या चर्चेवर आता अजित पवार काय म्हणतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
(हेही वाचा – ‘आप्पासाहेबांना महाराष्ट्र भूषण देऊन लाखो लोकांना जगण्याची प्रेरणा देण्याचे काम शिंदे-फडणवीसांनी केले’)
Join Our WhatsApp Community