उमेश पाल हत्याकांडातील आरोपी असद अहमद गेल्या आठवड्यात झाशी येथे झालेल्या चकमकीत ठार झाला. उमेशच्या हत्येनंतर असद फरार होता. आता त्याचे नाशिक कनेक्शन उघड झाले असून तो काही काळ नाशिकमध्ये वास्तव्यात असल्याचे देखील समोर आले आहे. त्याला मदत करणाऱ्या एका व्यक्तीला उत्तर प्रदेश पथकाने ताब्यात घेतले असून अधिक चौकशीसाठी त्याला लखनऊला नेण्यात आले आहे.
(हेही वाचा –नाशिक : भरदिवसा भाजप शहराध्यक्षावर गोळीबार; सर्वत्र खळबळ)
यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश मधील गुंड अतिक अहमद यांचा तिसरा मुलगा असद अहमद हा ज्यावेळी दिल्लीवरून लपण्यासाठी पळाला होता त्यावेळी तो पुण्याला जाण्यापूर्वी काही काळ नाशिकमध्ये थांबला होता. उत्तर प्रदेशच्या एटीएस कडून ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे. पुणे येथे असदला मदत करणाऱ्या व्यक्तींचा शोध सुरू आहे. परंतु, नाशिक मधून मदत करणाऱ्या एका व्यक्तीला उत्तर प्रदेश एटीएस पथकाने ताब्यात घेतले. नाशिकच्या पाथर्डी या परिसरातून त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांनी नाशिक पोलिसांना काहीच माहिती दिली नाही. त्यामुळे नाशिक पोलिसांकडे याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. ज्यावेळी असद नाशिकला आला होता त्यावेळी तो ओळख लपून राहत असल्याचे समोर आले आहे. परंतु पोलिसांनी याबाबत काहीच माहिती दिलेली नाही.
Join Our WhatsApp Community