उत्तरप्रदेशातील कुख्यात गुंड अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांना शनिवारी वैद्यकीय चाचणीसाठी नेताना तीन हल्लेखोरांनी त्यांची गोळ्या घालून हत्या केली. अतिक अहमदचे लश्कर-ए-तोयबा आणि आयएसआयशी संबंध होते. यासंदर्भात त्याच्याकडून मोठा खुलासा होण्याची शक्यता पाहता त्याची हत्या झाली असावी असा संशय वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना येतोय.
यासंदर्भात अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अतिक अहमदचा दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैय्यबा आणि पाकिस्तानी गुप्तहेर संघटना इंटर सर्विसेस इंटेलिजन्सशी (आयएसआय) थेट संबंध असल्याचे मान्य केले होते. अतिकच्या विरोधात पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात देखील हे नमूद केले होते. याबाबत दिलेल्या कबुलनाम्यात अतिक म्हणाला होता की, त्याचे लश्कर-ए-तैय्यबा आणि आयएसआय यांच्याशी थेट संबंध होते. या दोन्ही संघटना पाकिस्तानमधून पंजाब बॉर्डरवर ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रास्त्रे टाकायच्या. त्यांचे भारतातले एजंट ते तिथून गोळा करून जम्मू काश्मीर मधल्या दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांना आणि भारतातल्या इतर राज्यातील माफियांना ही शस्त्रे पोहोचवायचे. तसेच अतिकला पंजाब मधली अशी अनेक ठिकाणी माहिती होती, जिथे हे घडते. तसेच अतिकने पोलिसांना सांगितले होते की जर त्याला तिथे नेऊन तपास केला तर शस्त्रास्त्रे, पैसा, फेक करन्सी रिकव्हर करायला अतिक मदत करणार होता. याबाबत उत्तरप्रदेश पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर दोनच दिवसात झालेली अतिक आणि त्याचा भावाची हत्या पाकिस्तानकडे अंगुलीनिर्देश करते.
अतिकच्या कथनाला दुजोरा
उमेश पाल हत्याकांडातील आरोपी अतिक अहमद याचा मुलगा असद आणि त्याचा साथीदार मसूदचा मुलगा गुलाम या दोघांचा उत्तर प्रदेश पोलिसांनी गुरुवारी झाशीमध्ये एन्काऊंटर केले. त्यानंतर त्या दोघांकडून अत्याधुनिक बनावटीची दोन पिस्तुले जप्त केली. यापैकी एक ब्रिटिश बुलडॉग रिवाल्वर.455 बोअरचे आहे, तर दुसरे वॉल्थर पी 88 7.63 बोअरचे पिस्तूल आहे. ही अत्यंत घातक शस्त्र मानली जातात पोलिसांनी ही शस्त्रे त्या दोघांकडून जप्त केली आहेत. या गुन्हेगारांकडून इतकी अत्याधुनिक शस्त्रे सापडणे हे अतिकच्या पाकिस्तानी कनेक्शनला अधोरेखित करते.
मारेकऱ्यांकडे प्रतिबंधीत शस्त्रे
अतिक आणि अश्रफच्या हत्येनंतर एक महत्त्वाचा खुलासा झाला आहे. या दोघांचीही हत्या तुर्की बनावटीच्या झिंगाना पिस्तुलाने झाली आहे. हे त्याच बनावटीचे पिस्तूल असून असे शस्त्र सिद्धू मुसेवालाच्या हत्येसाठी देखील वापरण्यात आले होते. एकाच वेळी १७ गोळ्या लोड होणाऱ्या पिस्तुलाची किंमत सुमारे ४ लाख रुपये असून या पिस्तुलावर भारतात बंदी आहे. हे पिस्तूल पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे भारतीय हद्दीत पोहोचले होते, अशी माहिती तपास यंत्रणांच्या सूत्रांनी दिली आहे. आता त्याच्याच हत्येसाठी वापरण्यात आलेल्या पिस्तुला संदर्भात काही तपशील त्याच्या हत्येप्रमाणेच धक्कादायक आहेत. अतिकच्या मारेकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची आहे. तेव्हा त्यांच्याकडे इतके अत्याधुनिक आणि प्रतिबंधीत पिस्तुल असणे यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
एका दगडात दोन पक्षी मारण्याचा डाव
सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुलवामा हल्ल्यावरून टीका करून सरकार विरोधात अविश्वासाचे वातावरण निर्माण करणे. त्याच दिवशी अतिक व अश्रफची हत्या आणि मारेकऱ्यांनी हिंदू देवांच्या नावाने घोषणा देणे यामागे नेमका कुणाचा आणि काय हेतू आहे यादृष्टीने सुरक्षा यंत्रणा तपास करीत आहेत. अतिक अहमद पोलिसांकडे आयएसआयच्या नेटवर्कचा भांडाफोड करणार होता. त्यामुळे त्याचे तोंड बंद करून भारतात धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या हेतूने हे षडयंत्र रचले असावे हा तपासातील मोठा अँगल असल्याचा संशय तपास यंत्रणा व्यक्त करीत आहेत.
(हेही वाचा – अतिक अहमद प्रकरणात नाशिकमधून गुड्डू मुस्लिम किंवा अन्य कोणालाही अटक झालेली नाही, पोलिसांची माहिती)
Join Our WhatsApp Community