सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर कारवाई करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

165
सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या 'इंडिक टेल्स' वेबसाईटवर कारवाई करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या 'इंडिक टेल्स' वेबसाईटवर कारवाई करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.

‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी प्रसिद्ध केलेल्या लेखामध्ये त्यांच्याबद्दल अनेक आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या आहेत. याबद्दल अनेक राजकीय संघटना, सामाजिक संस्थांनी शासनाकडे आक्षेप नोंदवले. या आक्षेपांची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेबसाईटवरील मजकूर तपासून त्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

महापुरुषांच्या बाबतीत लिखाण करताना ते अत्यंत अभ्यासपूर्ण असायला हवे, तसेच त्यामधून त्यांचा अवमान होणार नाही याची दक्षता लेखक किंवा प्रकाशन संस्थांनी घेणे गरजेचे आहे. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांची शासन गय करणार नाही, असा इशारा देतानाच ‘इंडिक टेल्स’ वरील लेखात आक्षेपार्ह बाबी असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

राष्ट्रवादीने केले आंदोलन

दरम्यान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ आणि ‘हिंदू पोस्ट’ वेबसाईटवर बंदी आणून लेखकांवर आणि संबंधितावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजितपवार व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे बुधवारी ३१ मे रोजी भेट घेऊन केली. मुंबई पोलिस आयुक्तालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने आंदोलन करुन निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, बापूसाहेब भुजबळ, सदानंद मंडलिक, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश उपाध्यक्ष सुनिता शिंदे, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष राखी जाधव, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, युवक प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही पहा – 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.