पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगर येथील चौंडी येथे बुधवारी, ३१ मे रोजी आहिल्यादेवी होळकर यांच्या २९८व्या जयंतीनिमित्त मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर होते. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव आहिल्यादेवी होळकर नगर असे व्हावे ही इच्छा व्यक्त केली. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगेच त्यांच्या भाषणात घोषणा केली की, सर्वांची इच्छा आहे, त्यामुळे आपण अहमदनगरचे नाव बदलून आहिल्यादेवी होळकर नगर असे केले जाणार आहे. याबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आहिल्यादेवींचे माहेरचे आडनाव शिंदे आहे आणि मी पण शिंदेच आहे. आज येथे रामभाऊ शिंदे आणि गोपीचंद पडळकर यांनी मागणी मांडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझीही तीच इच्छा आहे. तसेच तुमच्या सर्वांच्या इच्छेखातर अहमदनगर जिल्ह्याचे नाव आहिल्यादेवी होळकर नगर असे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आहिल्यादेवींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत आहोत. आज या ऐतिहासिक सोहळ्याला मी उपस्थित आहे. देवेंद्र फडणवीस आणि मी येथे उपस्थित असल्याचा मला खूप अभिमान आहे. आहिल्यादेवींचे कर्तृत्व हिमायलाएवढे आहे. त्यामुळेच या अहमदनगरला त्यांचे दिले जाईल. हा निर्णय आमच्या सरकारच्या काळात घेतला जातोय हे आमचे भाग्य आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
Join Our WhatsApp Community