वरळीच्या समुद्रातील डॉल्फिन मनोरा उजळून निघणार

172
वरळीच्या समुद्रातील डॉल्फिन मनोरा उजळून निघणार
वरळीच्या समुद्रातील डॉल्फिन मनोरा उजळून निघणार

वरळी येथे समुद्रात सुमारे २२ वर्षांपूर्वी उभारलेल्‍या डॉल्फिन मनोऱ्याचे रुपडे बदलण्‍याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. या दोन मनोऱ्यांची डागडुजी, रंगरंगोटी केली जाणार असून सौर सागरी दिव्‍यांचा वापर त्‍यात समाविष्‍ट आहे. त्‍याचबरोबर गंज प्रतिरोधक शिडी आणि कठडेही नव्‍याने लावले जाणार आहेत.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्‍या मार्गदर्शनानुसार आणि मलनि:स्‍सारण प्रचालन विभागाचे प्रमुख अभियंता सतिश चव्‍हाण यांच्‍या सूचनेनुसार, मलनि:स्‍सारण व प्रचलन खात्‍यामार्फत विविध पर्यावरण पूरक बाबींचे नियोजन व व्‍यवस्‍थापन नियमितपणे करण्‍यात येत आहे.

मुंबईचे विशिष्ट भौगोलिक स्थान लक्षात घेऊन तसेच मुसळधार पावसाच्या पाण्याचा जलदगतीने निचरा व्हावा यासाठी लव्हग्रोव्ह (वरळी) येथे महानगरपालिकेने उदंचन केंद्र (पंपिंग स्टेशन) अर्थात पर्जन्‍य जल उदंचन केंद्र उभारले आहे. त्‍यात दोन उदंचन केंद्र आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्‍पाचा समावेश आहे. हे उदंचन केंद्र जानेवारी १९९१ पासून कार्यान्वित झाले असून वर्षातील ३६५ दिवस अविरत कार्यरत असते.

(हेही वाचा – BMC : वांद्रे- सांताक्रूझ परिसरात पुढील आठवड्यात ‘हे’ चार दिवस पाणी येणार ‘थेंब थेंब’)

लव्‍हग्रोव्‍ह उदंचन केंद्रातून बाहेर पडणारे प्रक्रियायुक्‍त सांडपाणी बाह्य बोगद्यातून ३.५ किलोमीटर लांब वाहिनीद्वारे समुद्रात सोडले जाते. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडून या सागरी बोगद्याची देखभाल केली जाते. वरळी सागरी बोगद्याचे ठिकाण आणि त्याच्‍या पातमुखाचे स्थान दर्शविण्‍यासाठी बोगद्याच्‍या शेवटी, समुद्राच्या आत दोन मनोरे उभारण्‍यात आले आहेत. त्‍यांना डॉल्फिन टॉवर संबोधण्‍यात येते. या डॉल्फिन मनोऱ्याच्‍या छतावर सौर ऊर्जेवर चालणारे दिवे लावण्‍यात आले आहेत.

समुद्रात तैनात नौसैनिक, खलाशी आणि मच्छीमारांनादेखील हे मनोरे सातत्यपणे आणि अखंडपणे दिशादर्शन करत असतात. तसेच, सागरी बोगदा क्षेत्रापासून दूर राहण्‍याकामी जहाज, नौका आणि सागरी जहाजांना सावधगिरीची सूचना देतात. हे मनोरे उभ्या काँक्रीट स्तंभाच्या संरचनेसह बांधण्‍यात आले आहेत. त्‍यास वरच्या बाजूला पंचकोनासारखा आकार आहे. सुरक्षिततेच्या उद्देशाने वरच्या संरचनेच्या परिघावर कठडे लावलेले आहेत. मनोऱ्याच्‍या वरच्या भागावर चढण्यासाठी आणि पोहोचण्यासाठी एक शिडी देखील आहे.

विशेष म्‍हणजे, या मनोऱ्यांच्‍या नजीकच्‍या परिसरातून दरमहा सांडपाण्याचे नमुने घेतले जातात. महाराष्‍ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि महानगरपालिका प्रयोगशाळेद्वारे त्‍यांची चाचणी केली जाते. या डॉल्फिन मनोऱ्यांची दुरुस्‍ती करण्‍याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. त्‍यानुसार, गंज प्रतिरोधक नवीन शिडी उपलब्ध करण्‍यात येणार आहे. कठड्यांची रचना देखील बदलण्‍यात येणार आहे. दोन्ही मनोऱ्यांवरील टेहळणी दिवे/प्रखर दिवे नव्‍याने बसविण्‍यात येणार आहेत. त्‍यासाठी सौर पॅनल आणि बॅटरीचा उपयोग केला जाणार आहे. चोरीच्‍या घटना रोखण्‍यासाठी उघडझाप करणारे फाटक (फ्लॅप गेट) बांधण्‍यात येणार आहे. तसेच, या संरचनांचे रंगकाम केले जाणार आहे. ही सर्व कामे विशेष स्‍वरूपाची असून त्‍यासाठी तज्‍ज्ञांची मदत घेतली जाईल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.