मध्य रेल्वेवर धावत असलेल्या सीएसएमटी – शिर्डी, सोलापूर आणि नागपूर-बिलासपूर या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ना मे महिना पावला आहे. मे महिन्यात या गाड्यांच्या प्रत्येक फेरीला १०० टक्के प्रतिसाद लाभला असून, रेल्वेच्या तिजोरीत भर पडली आहे.
रेल्वे मंत्रालयाने मेक इन इंडिया अंतर्गत वंदे भारत एक्सप्रेसची निर्मिती केली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात ७५ वंदे भारत एक्सप्रेस चालविण्यात येणार आहेत. सध्या मध्य रेल्वेवर सीएसएमटी-साईनगर शिर्डी, सोलापूर व नागपूर-बिलासपूर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. या तिन्ही गाड्यांना उन्हाळी सुट्टीमुळे प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, १० फेब्रुवारी ते २५ मे दरम्यान शिर्डी आणि सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसने तब्बल तीन लाख १६ हजार, तर डिसेंबरपासून सुरू झालेल्या नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसने पावणे दोन लाख प्रवाशांना सेवा दिली आहे. मे महिन्यात सर्वाधिक प्रवासी संख्येची नोंद झाली आहे.
आतापर्यंतची प्रवासी संख्या
- सीएसएमटी-साईनगर शिर्डी : १ लाख ६२ हजार ३२४
- सीएसएमटी-सोलापूर : १ लाख ५४ हजार ६४७
- नागपूर-बिलासपूर : १ लाख ७४ जार ४५०
आधुनिक वंदे भारतची वैशिष्ट्ये
वंदे भारत एक्सप्रेसला कवच तंत्रज्ञान आहे. प्रत्येक कोचमध्ये ३२ स्क्रीन आहेत. दिव्यांगांसाठी अनुकूल स्वच्छतागृहे आणि आसन क्रमांक ब्रेल अक्षरात दिलेली आहेत. जंतूमुक्त हवेच्या पुरवठ्यासाठी अल्ट्रा व्हायोलेट दिवा आणि टच फ्री सुविधांसह व्हॅक्यूम टॉयलेटची सुविधा आहे.
Join Our WhatsApp Community