मुंबई महापालिकेच्या (BMC) सहा उपप्रमुख अभियंत्याना प्रमुख अभियंता पदी बढती मिळाली असून यातील चंद्रकांत मेतकर यांच्याकडे जल अभियंता पदाचा तर राजू जहागीरदार, यांच्याकडे पर्जन्य जल अभियंता विभागच्या प्रमुख अभियंता पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
उपप्रमुख अभियंता संजय कौंडण्यपुरे,रवींद्र सोनवणे, संदीप कांबळे, राजू जहागीरदार, चंद्रकांत मेतकर, वसंत गायकवाड आदींना प्रमुख अभियंता पदी बढती दिल्यानंतर महापालिका (BMC) आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी त्यांची नियुक्ती विविध विभाग तथा खात्याच्या प्रमुख अभियंता पदी केली. त्यानुसार सर्वांच्या नियुक्तीचे कार्यलयीन आदेश जारी झाले असून त्यात १ जून २०२३ रोजी सेवा निवृत्त होणाऱ्या रवींद्र सोनवणे यांची सागरी किनारी रस्ता प्रकल्पाच्या प्रमुख अभियंता पदी नियुक्ती केली. सोनवणे हे एक दिवसाचे प्रमुख अभियंता बनले असून १ जून रोजी ते सेवानिवृत्त झाल्याने या प्रकल्पाच्या प्रमुख अभियंता पदाचा प्रभारी भार उपप्रमुख अभियंत्यांवर सोपवला जाणार आहे.
(हेही वाचा – BMC : नाल्यातून गाळ काढला नाही तर ‘या’ मोबाईल व्हॉट्सअपवर पाठवा फोटो आणि करा तक्रार)
तर पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांच्या अर्थात पर्जन्य जल वाहिनी विभागाच्या प्रमुख अभियंता पदी राजू जहागीरदार यांची नियुक्ती (BMC) केली आहे. यापूर्वी या विभागाच्या प्रभारी प्रमुख अभियंता पदाचा उपप्रमुख अभियंता(पश्चिम उपनगरे) विभास आचरेकर यांच्याकडे होता. आचरेकर यांनी या विभागाची धुरा सक्षमपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला असला या पदावर सेवेचा निश्चित कालावधी पूर्ण न झाल्याने त्यांच्याकडे उपप्रमुख अभियंता पदाचा भार कायम ठेवून प्रमुख अभियंता म्हणून बढती मिळालेल्या राजू जहागीरदार यांच्याकडे या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र, आचरेकर यांनी आपल्याकडील ही प्रभारी अभियंता पदाची जबाबदारी काढून अन्य कुणाही अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जावी असे वारंवार प्रशासनाला सांगण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे येत्या पाच ते सहा महिन्यांनी त्यांना प्रमुख अभियंता पदी बढती मिळाल्यानंतर त्यांच्यावर पर्जन्य जल वाहिनी विभाग किंवा अन्य विभागाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.
तर प्रभारी जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांच्याकडील अतिरिक्त कार्यभार कमी करून या पदी प्रमुख अभियंता चंद्रकांत मेतकर यांची नियुक्ती (BMC) केली आहे. पावसाळयात पर्जन्य जलवाहिनी विभाग आणि जल अभियंता विभाग हे महत्वाचे असून या पदावर कायम प्रमुख अभियंता यांची नियुक्ती केल्याने या पदावरील अधिकाऱ्याला स्वतःच्या अधिकारात निर्णय घेण्याचे अधिकार राहणार आहे. ज्यामुळे विभाग व खात्याला ते न्याय देऊ शकणार आहेत. तर उपप्रमुख अभियंता संजय कौंडण्यपुरे यांच्याकडे प्रभारी प्रमुख अभियंता (पूल) विभागाची जबाबदारी होती. पण त्यांना प्रमुख अभियंता पदी बढती मिळाल्याने त्यांच्याकडे या पूल विभागाचा भार कायम ठेवण्यात आला आहे. तर संदीप कांबळे यांची मलनि:स्सारण प्रकल्पाच्या प्रमुख अभियंतापदी तर वसंत गायकवाड यांची पाणी पुरवठा प्रकल्पाच्या प्रमुख अभियंता पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यातील गायकवाड हे येत्या १ जुलै रोजी सेवा निवृत्त होत असल्याने पुढील महिन्यात या पदाचा भार उपप्रमुख अभियंता पदी सोपवला जावा लागणार आहे.
हेही पहा –
मुंबई महापालिकेत (BMC) ११ प्रमुख अभियंता पदी प्रभारी अधिकारी असल्याने यातील सहा उपप्रमुख अभियंत्या बढती देण्यात आली असली तरी पाच खात्यांच्या तथा विभागाचा भार प्रभारी प्रमुख अभियंता यांच्याकडे आहे. उप प्रमुख अभियंता पदावर सेवेचा कालावधी दोन वर्षे पूर्ण व्हायला लागतो. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर उपप्रमुख अभियंत्याला प्रमुख अभियंता पदी बढती दिली जाते. त्यामुळे पुढील सहा महिन्यात या पदाचा भार कायम प्रमुख अभियंता पदाच्या अधिकाऱ्याकडे सोपवला जाईल.
प्रमुख अभियंत्यांवर या पदाचा भार
संजय कौंडण्यपुरे, प्रमुख अभियंता (पूल)
रवींद्र सोनवणे, प्रमुख अभियंता ( सागरी किनारी रस्ता)
संदीप कांबळे, प्रमुख अभियंता( मलनि:स्सारण प्रकल्प)
राजू जहागीरदार, प्रमुख अभियंता (पर्जन्य जल अभियंता)
चंद्रकांत मेतकर, (जल अभियंता)
वसंत गायकवाड , प्रमुख अभियंता ( पाणी पुरवठा प्रकल्प)
Join Our WhatsApp Community