अखेर लोअर परळ पुलाची एक मार्गिका वाहतुकीसाठी झाली खुली

246
अखेर लोअर परळ पुलाची एक मार्गिका वाहतुकीसाठी झाली खुली
अखेर लोअर परळ पुलाची एक मार्गिका वाहतुकीसाठी झाली खुली

लोअर परळ, वरळी, प्रभादेवी आणि करीरोड, भायखळा परिसराला जोडणाऱ्या लोअर परळ (डिलाईल रोड) पुलाची पश्चिमेकडील मार्गिका गुरुवारी १ जून २०२३ पासून वाहनचालकांसाठी खुली करण्यात आली आहे. ही मार्गिका खुली केल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच उर्वरित टप्प्यातील पूर्व दिशेचा पूल जुलै २०२३ अखेरीस वाहतुकीसाठी संपूर्ण क्षमतेने खुला होईल.

लोअर परळ पुलाचे काम वेगाने पूर्णत्वास नेण्यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांचे निर्देश होते. पावसाळ्यापूर्वी नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी संपूर्ण कामाचा सातत्याने पाठपुरावा केला. आगामी कालावधीत पूर्वेकडील पूलाचा भाग हा नागरिकांना वापरासाठी उपलब्ध होईल यासाठीच्या सूचना पूल विभागाचे प्रमुख अभियंता संजय कौंडण्यपुरे यांनी केल्या आहेत.

लोअर परळ पश्चिमेला सेनापती बापट मार्ग जंक्शन येथून येणाऱ्या गणपतराव कदम मार्गावर उर्मी इस्टेट आणि पेनिनसुला कॉर्पोरेट पार्क येथून रेल्वे स्पॅनपर्यंतची मार्गिका वाहतूक पोलिसांच्या सुचनेनुसार खुली करण्यात आली आहे. याच पुलावर पुढे डावीकडे ना. म. जोशी मार्गावर वेस्टर्न रेल्वे वर्कशॉप आणि दादरच्या दिशेने जाणारी मार्गिका ही वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. डिलाईल रोड पुलाच्या कामातील पूर्वेच्या दिशेची काही कामे आगामी कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित आहे. यामध्ये वाहतुकीसाठीच्या रॅम्पचे तसेच कॉंक्रिटीकरण, डांबरीकरण, पथदिवे, रंगकाम इत्यादी कामे समाविष्ट आहेत. ही कामे पूर्ण करून पूर्व दिशेची मार्गिका जुलै महिन्याच्या अखेरीस सुरू करण्याचा महानगरपालिकेच्या पूल विभागाचा प्रयत्न असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी बाहेरील बाजूला पदपथ

लोअर परळ येथील पुलाचे पुनर्बांधणीचे काम रेल्वे भागामध्ये पश्चिम रेल्वेकडून तर महानगरपालिकेच्या हद्दीत पूल विभागामार्फत करण्यात येत आहे. रेल्वे भागामध्ये एक जुन्या प्लेट गर्डर ऐवजी नवीन दोन ओपन वेब गर्डर या पद्धतीने पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. रेल्वेवरील भाग ओलांडण्यासाठी पुलाच्या तसेच पादचारी यांच्या सुरक्षितेसाठी ओपन वेब गर्डरच्या बाहेरील बाजूने पदपथ बांधण्यात आला आहे. महानगरपालिका क्षेत्रात ४ जिने व दोन सरकते जिने बांधून सदर पदपथ जोडण्यात येणार आहेत.

पुलाखाली अतिरिक्त भुयारी मार्ग

जुना लोअर परळ पूल हा मातीचा भराव आणि दगडी बांधकामाद्वारे बांधण्यात आला होता. त्यामुळे बाजूचे सेवा रस्ते (सर्व्हीस रोड) अरुंद होते. तसेच पोहोच मार्गामधून क्रॉसिंगसाठी फक्त एक भुयारी मार्ग उपलब्ध होता. परंतु आता नव्याने बांधण्यात येणारा लोअर परळ पूल स्टील गर्डर वापरून बांधण्यात येत असल्यामुळे पुलाखाली क्रॉसिंग साठी मुबलक जागा उपलब्ध असणार आहे. तसेच बाजूचे सेवा मार्ग हे पूर्वीपेक्षा रुंद असणार आहेत.

लोअर परळ पूलाच्या पुनर्बांधणीच्या कामात ९० मीटर लांबीचे आणि ११०० टन वजनाचे दोन गर्डर हे पश्चिम रेल्वेच्या रूळांवर स्थापित करणे हे संपूर्ण प्रकल्पातील सर्वात मोठे आव्हानाचे काम होते. त्यानंतर दक्षिण दिशेकडील भाग हा तोडकामासाठी ऑक्टोबर २०२२ मध्ये महानगरपालिकेकडे सोपविण्यात आला. पश्चिम रेल्वेने याठिकाणी २२ जून २०२२ रोजी पहिला स्टील गर्डर तर दुसरा गर्डर २४ सप्टेंबरमध्ये लाँच केला. सध्या लोअर परळ पुलाचे ८७ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम जुलै २०२३ अखेरीस पूर्ण होणे अपेक्षित आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.