शिवसेना पक्षामध्ये सध्या उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी आता प्रवेश करण्यास सुरुवात केली असून दोनच दिवसांपूर्वी चांदिवली विधानसभेतील अपक्ष म्हणून नगरसेवक निवडून आलेल्या परंतु शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी नगरसेवक किरण लांडगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांमध्ये पूर्व उपनगरातील आणखी काही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील पदाधिकारी तसेच माजी नगरसेवक प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
मुंबईतील चांदिवली विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १६० चे माजी नगरसेवक किरण ज्योतिबा लांडगे यांनी चांदिवली शिव वाहतूक सेनेचे चिटणीस अर्जुन घोलप यांनी दोन दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेना पक्षात प्रवेश केला. शिवसेनेतून बाजुला झाल्यानंतर आणि अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील यशवंत जाधव, समाधान सरवणकर, शीतल म्हात्रे, दत्ता नरवणकर, आत्माराम चाचे, संतोष खरात, परमेश्वर कदम, धनश्री भरडकर, चंद्रावती मोरे आदी प्रवेश केला असून किरण लांडगे यांच्या रुपात दहावा माजी नगरसेवकाने शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.
लांडगे हे चांदीवली विधानसभेचे आमदार दिलीप लांडे यांच्या अत्यंत जवळचे होते. तसेच त्यांच्यावर महापालिका अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा गुन्हा महापालिकेने नोंदवला होता. लांडगे आणि माजी नगरसेविका अश्विनी मते यांच्यात वाद असून त्यामुळेच भविष्यात हा प्रभाग महिला आरक्षित झाल्यास आपल्या पत्नीला तिकीट मिळताना मोठा संघर्ष करावा लागेल या भीतीनेच लांडगे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे बोलले जात आहे. लांडगे यांनी अपक्ष म्हणून निवडून येतात माजी नगरसेविका शिवसेना उमेदवार अश्विनी मते यांचा पराभव केला होता. त्यामुळे लांडगे आणि मते यांच्यातील संघर्ष जगजाहीर होता आणि लांडगे यांनी पक्षातील वजनही वाढवले असले तरी उध्दव ठाकरे गटाच्या शिवसेनेत राहून निवडून येणे अशक्य असल्याने लांडगे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे लांडगे यांच्या नंतर येत्या दोन दिवसांमध्ये आमदार लांडे यांचे अत्यंत विश्वासू असलेले उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेते एक पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय पुढील आठ ते दहा दिवसांमध्ये पूर्व उपनगरांतील चार ते पाच माजी नगरसेवक तथा पदाधिकारी यांचाही शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ निश्चित झाल्यानंतर यासर्वांचे प्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे.
आमदार दिलीप लांडे यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश केलेल्या दत्ता नरवणकर, परमेश्वर कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून संजय व अर्चना भालेराव, आशिष व हर्षिला मोरे, अश्विनी व अशोक माटेकर हे अजुनही उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेत असून यासर्वांकडे पक्षात सध्या संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे.
Join Our WhatsApp Community