प्रभादेवीतील श्री सिध्दीविनायक मंदिरात सुरु असलेला अनधिकृत लाडू कारखाना आणि तिथे सुरु असलेल्या बांधकामाप्रकरणी महापालिकेच्या जी उत्तर विभागाच्यावतीने नोटीस बजावण्यात आली आहे. मंदिरातील प्रतिक्षालयाच्या इमारतीच्या तळमजल्यावर ठेवलेले ज्वलनशील पदार्थ त्वरित योग्य ठिकाणी स्थलांतरित करावे व मंदिराच्या आवारात सुरू असलेल्या दुरुस्तीचे कामाच्या सभोवताली सुरक्षिततेच्या दृष्टीने कुंपण करून कमकुवत झालेला भाग महापालिकेच्या नोंदणीकृत संरचनात्मक सल्लागार तथा अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली व निरीक्षणाखाली दुरूस्ती करून घ्यावा अशाप्रकारच्या सूचना केल्या आहे.
श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये अनधिकृतपणे लाडू बनवण्याचा कारखाना सुरू असल्याबाबतची तक्रार जी उत्तर विभागाला प्राप्त झाली. सदर तक्रारपत्राच्या अनुषंगाने या जी उत्तर विभागाच्या इमारत व कारखाना विभागाच्या मार्फत. १२ मे २०२३ रोजी सिद्धिविनायक मंदिरात स्थळ पाहणी करण्यात आली होती व पाहणी दरम्यान सदर ठिकाणी मंदिराच्या प्रतिक्षालयाच्या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर लाडू बनवले जात असल्याचे व या प्रतिक्षालयाच्या इमारतीच्या तळमजल्यावर ज्वलनशील पदार्थ जसे की, तुप, तेलाचा मोठ्याप्रमाणात साठा करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. तसेच या मंदिराच्या आवारात मोठ्या स्वरुपाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे या कामांकरता मोठा लोखंडी जिना उभारला आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही खबरदारी घेण्यात आलेला नसल्याचे दिसून आले होते.
(हेही वाचा – वरळी कोळीवाड्यांतील झोपड्यांच्या भिंती आणि छतांकडे आपण आता पाहतच राहणार!)
त्यामुळे १६ मे २०२३ रोजी जी उत्तर विभागाचे इमारत व कारखाना विभागाचे सहायक अभियंता राजेश राठोड यांच्या स्वाक्षरी श्री सिध्दिविनायक मंदिर ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी यांच्या नावे ही नोटीस जारी करण्यात आली आहे. ज्यात त्यांनी ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याचे म्हटले आहे. मंदिराच्या आवारात भाविकांचे वर्दळ असून ज्वलनशील पदार्थ असल्याने आग लागून व दुरुस्तीच्या कामाचा कोणताही भाग कोसळून दुघर्टना होण्याची किंवा जिवितहानी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही असे म्हटले आहे. त्यामुळे आपण सिद्धिविनायक मंदिरातील प्रतिक्षालयाच्या इमारतीच्या तळमजल्यावर ठेवलेले ज्वलनशील पदार्थ त्वरित योग्य ठिकाणी स्थलांतरित करावे व मंदिराच्या आवारात सुरू असलेल्या दुरुस्तीचे कामाच्या सभोवताली सुरक्षिततेच्या दृष्टीने कुंपण करून कमकुवत झालेला भाग म.न.पा नोंदणीकृत संरचनात्मक सल्लागार / अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली व निरीक्षणाखाली दुरूस्ती करून घ्यावा. जेणेकरून या ठिकाणी कोणतीही अपरिहार्य घटना घडणार नाही, याची कृपया काळजी घ्यावी. अन्यथा या विभागामार्फत महापालिका तथा महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमानुसार सबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community