मुंबईतील एका हॉटलमध्ये झालेल्या खुनाच्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी मुंबई पोलिसांना ‘त्या’ची २० वर्षे वाट पाहावी लागली आहे. २० वर्षे अटकेच्या भीतीने देशभरात फिरणाऱ्या खुनातील आरोपीला अखेर शनिवारी ठाण्यातील एका मिठाईच्या दुकानातून अटक करण्यात सांताक्रूझ पोलिसांना यश आले.
मुंबईतील विलेपार्ले परिसरातील नेस्ट हॉटेलमध्ये २००३ साली दिल्लीतील दीपक राठोड या कापड व्यापाऱ्याची हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर त्याच्या सोबत असणारा त्याचा जोडीदार रुपेश रॉय हा फरार झाला होता. हे दोघे मुंबईत फिरण्यासाठी आले होते, हॉटेलच्या खोलीत दोघांमध्ये भांडण होऊन त्यात रॉय याने दीपक राठोड याची हत्या केली होती. हत्येनंतर त्याने दीपक राठोडकडे असलेले १ लाख ३० हजार रुपयांसह फरार झाला होता. याप्रकरणी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सांताक्रूझ पोलीस, मुंबई गुन्हे शाखा यांनी रुपेश रॉयला जंगजंग पछाडले मात्र तो पोलिसांना सापडत नव्हता.
(हेही वाचा – धारावी जाळपोळ प्रकरण: ७० टक्के भाजलेल्या ‘ति’ची मृत्यूशी झुंज अखेर संपली)
अनेक वर्ष पोलिसांनी त्याच्या घरावर तसेच कुटुंबावर पाळत ठेवूनही पोलिसांना अपयश येत होते. परंतु पोलिसांनी त्याचा पिच्छा काही सोडला नाही. मागील २० वर्षांपासून रुपेश रॉय याचा थांगपत्ता शोधत असताना रुपेश रॉय हा अतुल केडीया हे नाव धारण करून राहत असल्याची माहिती काही आठवड्यापूर्वी सांताक्रूझ पोलिसांच्या हाती लागली. तपास पथकाने रुपेश रॉयचा नाही तर अतुल केडीया याची माहिती काढण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या या प्रयत्नांना यश आले व अतुल केडीया याची माहिती हाती लागली. रुपेश रॉय उर्फ अतुल केडीया याने मागील २० वर्षात वेगवेगळ्या राज्यात काम करीत होता. झारखंड राज्यातून रॉय याने अतुल केडीया नावाने आधारकार्ड काढले होते, व त्याने पासपोर्टसाठी अर्ज केल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. या माहितीच्या आधारे अतुल केडीयाचा शोध घेत असताना रॉय उर्फ केडीया हा ठाण्यातील एका मिठाईच्या दुकानात नोकरी करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्याला शनिवारी ठाण्यातून अटक करण्यात आली. रुपेश रॉय उर्फ अतुल केडीया याचे गुन्हा करतानाचे वय २० वर्षे होते आता तो ४० वर्षाचा आहे, रुपेश हा मूळचा बिहार राज्यातील मुझफ्फरपूर येथील राहणारा आहे. २० वर्षानंतर सांताक्रूझ पोलिसांनी दीपक राठोड या व्यापाऱ्याच्या खुनाची उकल करून आरोपीला अखेर जेरबंद केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community