ज्या काळात आणि ज्या परिस्थितीत शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्या काळात आणि त्याच्या आधी निजामशाही, अदिलशाही, मोगल, फारुखी सल्तनत, बरिदशाही, तुघलक, खिलजी, बहामनी, इमादशाही, कुतुबशाही आणि या व्यतिरिक्त लोधी, सिद्धी, पोर्तुगिज आणि इंग्रज या परकीय आक्रमकांनी देशाच्या स्वातंत्र्यसूर्याला ग्रासले होते आणि अशा परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्य स्थापून स्वतःचा राज्याभिषेक करून घेणे ही साधी गोष्ट नव्हती. हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे आपले अपुरे स्वप्न शहाजीराजांनी आपल्या मुलात पाहिले होते. त्यावेळी अवघ्या बारा वर्षांच्या मुलाकडून शहाजीराजांनी केलेली अपेक्षा महाराजांनी खऱ्या अर्थाने सार्थ केली. शहाजीराजांनी शिवरायांना राजमुद्रा आणि प्रधानमंडळ देऊन त्यांच्या जीवनाचे ध्येय निश्चित केले. या राजमुद्रेत एक अर्थ दडला आहे. तो अर्थ नेमका काय आहे हेच आपण पाहणार आहोत.
प्रतिपच्चंद्रलेखेव। वर्धिष्णुर्विश्ववंदिता।
शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।।
प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे दररोज वृध्दिंगत होणारी, जगाला वंदनीय असणारी शाहपुत्र शिवाजीची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे’, असा त्याचा अर्थ होतो.
(हेही वाचा – Shivrajyabhishek : शिवप्रेमींनी सिंहगडावर अनुभवला शिवराज्याभिषेक सोहळ्याचा सुवर्णक्षण)
ही राजमुद्रा तयार करणाऱ्या शहाजी राजांचे विचार आणि बुद्धिवैभव आपल्या लक्षात येते. राजमुद्रेतला प्रत्येक शब्द हा अत्यंत विचारपूर्वक मांडण्यात आला होता. राजमुद्रेतून महाराजांचे भविष्यातील ध्येय आणि हेतू निश्चित झाले आहेत. शहाजीचा पुत्र प्रतिदिनी वृद्धिंगत होणारे राष्ट्र निर्माण करणार आहे हे ध्येय आहे आणि राष्ट्रनिर्माण हे स्वसुखासाठी नसून प्रजेच्या हितासाठी असल्याने ही मुद्रा विश्ववंद्य होईल हा हेतू स्पष्ट केला आहे. हे कार्य करणारा माझा पुत्र शिवाजी आहे आणि जगाच्या कल्याणासाठी त्याचे राज्य आहे असा विश्वास गांजलेल्या, दु:खी, कष्टी जनतेच्या मनात या राजमुद्रेद्वारे निर्माण केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community