MVA : महाविकास आघाडी भाव देईना; शेकापच्या जयंत पाटलांकडून वेगळा विचार सुरू

'मविआ'तील प्रमुख पक्षांत जागा वाटपावरून सुरू असलेली धुसफूस पाहता, आगामी निवडणुकांवेळी छोट्या पक्षांना फारशा जागा मिळण्याची शक्यता नाही.

240
संग्रहित छायाचित्र
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव सेनेकडून महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांना दुय्यम महत्त्व दिले जात असल्याने, या पक्षातील नेते अस्वस्थ आहेत. ‘मविआ’तील प्रमुख पक्षांत जागा वाटपावरून सुरू असलेली धुसफूस पाहता, आगामी निवडणुकांवेळी छोट्या पक्षांना फारशा जागा मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे तिसरी आघाडी तयार करून, आपले महत्त्व पुन्हा अधोरेखित करण्याचा प्रयत्न काही नेत्यांनी सुरू केला आहे. शेकापचे जयंत पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
राज्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने महाविकास आघाडीचा प्रयोग केला. त्या आघाडीत छोट्या पक्षांना सोबत घेतले; पण प्रत्यक्षात सत्तेचा वाटा दिला नाही. यापूर्वीही आघाडी सरकारच्या काळात त्यांना सत्तेचा वाटा देण्यात आला नव्हता. त्यामुळे या पक्षाच्या नेत्यांनी महाविकास आघाडीत न जाता तिसरी आघाडी करण्याचे ठरविले आहे. शेकापचे नेते जयंत पाटील, बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची अलीकडे बैठक झाली, त्यात छोट्या पक्षांनी निवडणूकपूर्व आघाडी करून राज्यात सत्तेत महत्वाची भूमिका बजावली पाहिजे, याबाबत तिन्ही नेत्यांचे एकमत झाले.
भाजपा-सेनेची आघाडी काय, किंवा काँग्रेस-राष्ट्रवादीची युती काय, गरज पडली की छोट्या पक्षांचा वापर करून घेतात आणि गरज संपली की दूर करतात. हा पूर्वानुभव सोबत असल्यामुळे आता युती आणि आघाडीत जाऊन स्वतःचे नुकसान करून न घेता वेगळी वाट चोखाळण्याचे या नेत्यांनी ठरवले आहे. कारण, १४५ चा आकडा गाठणे आघाडी आणि युतीला सहजशक्य होत नाही, हे विधानसभेच्या गेल्या काही निवडणुकीच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. त्यामुळे २० आमदार असलेल्या आघाडीला राज्याच्या राजकारणात महत्त्व येवू शकते, असा या नेत्यांचा दावा आहे. त्यामुळे तिसरी आघाडी स्थापन करण्याचे त्यांनी ठरविले आहे.

मित्रांचा शोध सुरू

राज्यात रायगडसह काही जिल्ह्यात शेकापची ताकद आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे पालघर आणि ठाणे जिल्ह्यात प्राबल्य आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा कोल्हापूरसह राज्यातील काही भागात प्रभाव आहे. आणखी काही पक्षांना सोबत घ्यायचे, असे या नेत्यांनी ठरविले आहे. त्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांच्याशी ते चर्चा करणार आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.