राज्यात आमचे सरकार सर्वसामान्यांसाठी अनेक उपाययोजना राबवित असून, आम्ही ‘सरकार आपल्या दारी’सारखे उपक्रम राबवित आहोत, तर पूर्वीच्या सरकारचा ‘सरकार स्वत:च्या घरी’ असा कारभार होता, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
राज्यात उदंचन (पम्पिंग स्टोरेज) जलविद्युत प्रकल्पासंदर्भात मंगळवारी 71 हजार कोटी रुपयांचे करार करण्यात आले, त्यानंतर सह्याद्री अतिथीगृह येथे ते पत्रकारांशी बोलत होते. यात नॅशनल हायड्रो पॉवर कार्पोरेशनच्या माध्यमातून 44,000 कोटी रुपयांचे 7350 मेवॅ. क्षमतेचे प्रकल्प उभारण्यात येणार असून, खाजगी टोरंट पॉवर लि. कंपनीच्या माध्यमातून 5700 मेवॅ. क्षमतेचे प्रकल्प, 27,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह उभारण्यात येणार आहेत. नॅशनल हायड्रोचे प्रकल्प सावित्री (2250 मेवॅ), काळू (1150 मेवॅ), केंगाडी (1550 मेवॅ.), जालोंद (2400 मेवॅ.), तर टोरंटचे कर्जत (3000 मे.वॅ.), मावळ (1200 मे.वॅ.), जुन्नर (1500 मेवॅ.) येथे प्रकल्प असतील. एकूण 30 हजार रोजगार यातून निर्माण होणार असून, एकूण गुंतवणूक ही 71 हजार कोटी रुपये इतकी असणार आहे.
हे प्रकल्प नवीनीकरणीय उर्जेचा भाग असून, जागतिक स्तरावर आता अपारंपारिक ऊर्जा निर्मितीकडे अधिक लक्ष देण्यात येत आहे. केंद्र सरकारचा सुद्धा यासाठी आग्रह आहे. खालच्या जलाशयातून पाणी सौर उर्जेतून उचलले जाते. रात्रीच्या वेळी तेच पाणी खालच्या स्तरामध्ये आणले जाते आणि यातून पपिंग मोडद्वारे वीजनिर्मिती मोठ्या प्रमाणात करण्यात येते. अपांरपारिक उर्जेच्या क्षेत्रात हे करार असून एवढी गुंतवणूक अन्य कुठल्याही राज्यात आलेली नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत असून, कालच एफडीआयची आकडेवारी आली. महाविकास आघाडीच्या काळात कधी कर्नाटक तर कधी गुजरात क्रमांक एकवर होता. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राला क्रमांक 1 चे राज्य करु, हे आम्ही आधीपासून सांगत होतो. आता आलेल्या ताज्या आकडेवारीतून महाराष्ट्र पुन्हा क्रमांक एकचे राज्य बनले आहे. उद्योग बाहेर गेले असे म्हणणार्यांनी आता तोंडं बंद केली पाहिजे, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांचे विधान भरकटविण्यासाठी
प्रकाश आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव आयोगासंदर्भात केलेल्या वक्तव्यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, यापूर्वीही विविध लोकांनी विविध प्रकारचे अर्ज केले होते. त्यावर आयोगाने कायद्यानुसार निर्णय घेतले आहेत. प्रकाश आंबेडकर हे स्वत: निष्णात वकील आहेत त्यामुळे कुणाला बोलाविले पाहिजे आणि कुणाला नाही, हे त्यांना ठावूक आहे. भरकटविण्यासाठी ते अशी विधाने करीत आहेत. बीबीसीने कर बुडविल्याचे मान्य केल्यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, ज्यावेळी कारवाई झाली, तेव्हा अनेकांनी ओरड केली होती. आता सत्य समोर आल्याने ज्यांनी या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण केले, त्यांचे डोळे उघडायला हवे. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यावेळी किलबिलाट रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. लहान मुलांसाठी विशेषत: ज्यांचे कुणी नाही, अशा मुलांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्यासाठी हा उपक्रम मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला होता.