पुन्हा एकदा काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला असून सचिन पायलट नवीन पक्ष स्थापन करणार असल्याची चर्चा राजधानीत चांगलीच रंगली आहे. राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांच्यासोबत पायलट यांचे बोलणे सूरु असून 11 जून रोजी नवीन पक्षची घोषणा पायलट करु शकतात, अशी माहिती प्राप्त झाली आहे. पक्षाचे नाव प्रगतीशील काँग्रेस ठरले असल्याचेही सूत्राकडून समजते.
(हेही वाचा Mohammad Rizwan : पाकचा क्रिकेटर मोहम्मद रिझवानने अमेरिकेत दाखवली धर्मांधता; रस्त्यावर नमाज पढला)
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वाद संपुष्टात आला असल्याचे नुकतेच काँग्रेसकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र सचिन पायलट यांच्या पुढील वाटचालीबाबत अटकळ बांधली जात आहे. सचिन पायलट काँग्रेसला रामराम ठोकून आपल्या स्वतंत्र पक्षाची स्थापना करु शकतात, अशी चर्चा रंगू लागली आहे. त्यावर पायलट यांच्या निकटवर्तीयांनी या चर्चा फेटाळल्या आहेत. राजस्थान सरकारमधील कृषी राज्यमंत्री मुरारी लाल मीणा म्हणाले की, ‘सचिन पायलट यांचा काँग्रेस सोडण्याचा कोणताही विचार नाही. आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे सैनिक आहोत. दोन नेते (गहलोत आणि पायलट) पक्षाच्या हायकमांडला भेटले आहेत. आम्ही सगळे मिळून लढू’, असे सांगितले आहे. तरीदेखील 11 जून रोजी सचिन पायलट स्वत:चा स्वतंत्र पक्ष काढतील, अशी चर्चा आहे. मात्र याबाबत स्वतः पायलट किंवा त्याच्या समर्थकांनी दुजोरा दिलेला नाही. सचिन पायलट नवा पक्ष स्थापन करणार का असा प्रश्न विचारला असता मुरारी लाल मीणा म्हणाले की, दरवर्षी 11 जून रोजी आम्ही सगळे राजेश पायलट यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहतो. ते शेतकरी नेते होते. दरवर्षी शोकसभा आयोजित केली जाते. यंदाही ही शोकसभा असेल. पायलट स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याच्या चर्चा निराधार आहेत, असे ते म्हणाले.