शिंदे-फडणवीस सरकारसाठी महापालिका आयुक्तांचा ‘ठाकरे फॉर्म्युला’

259
शिंदे-फडणवीस सरकारसाठी महापालिका आयुक्तांचा 'ठाकरे फॉर्म्युला'
शिंदे-फडणवीस सरकारसाठी महापालिका आयुक्तांचा 'ठाकरे फॉर्म्युला'

मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी शिंदे सरकारबाबतही ठाकरे फॉर्म्युला वापर करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात ठाकरे सरकार असताना ज्या प्रकारे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीची विशेष काळजी घेत त्यांचे खास आदरतिथ्य केले जात होते, त्याच पद्धतीचा वापर आता शिंदे-फडणवीस सरकारच्या काळातही चहल हे याच कार्यपद्धतीचा वापर करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकदा का मुख्यमंत्री आणि त्यांच्या खास माणसांचा आशीर्वाद मिळाला की त्यांना खुश ठेवत त्यांच्या पक्षातील इतरांना कात्रजचा घाट दाखवायचा असाच काहीसा पवित्रा ठाकरे सरकारच्या काळात पाहायला मिळाला आणि आता शिंदे-फडणवीस सरकारच्या काळातही पाहायला मिळत आहे.

राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार हे २०१९ मध्ये स्थापन झाल्यानंतर महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र तत्कालीन पर्यावरण मंत्री व उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांची विशेष काळजी घेत प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या विकास कामासंदर्भातील संकल्पना व प्रकल्प कामे ही त्यांच्या नावाचे लेबल लावून सुरू केले. आणि याचे श्रेय उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना कसे जाईल यासाठी प्रयत्न केला. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे यांचा मुंबईच्या विकासाचा दृष्टिकोन किती चांगला आहे अशी त्यांची प्रतीमा निर्माण करण्याचा प्रयत्न आयुक्तांनी केला. याद्वारे उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचा विश्वास संपादन केल्यानंतर आयुक्तांनी महापालिकेतील तत्कालीन शिवसेना पक्षाच्या नगरसेविका असलेल्या महापौर, सभागृह नेत्या, स्थायी समिती अध्यक्ष तसेच त्यांच्या पक्षातील नगरसेवक यांना तांदळातील खड्या प्रमाणे बाजूला कायम दुर्लक्षित केले. महापालिकेतील ही वजनदार आणि प्रभावशील पदे असताना आयुक्तांनी त्यांना केवळ मुख्यमंत्री व पालकमंत्री यांचा आपल्या डोक्यावर हात असल्याने त्यांना जुमानले नाही. आणि आज जरी महापालिका अस्तित्वात नसल्याने प्रशासक नियुक्त केले असले तरी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी आपल्याच पक्षाची सत्ता महापालिकेत असतानाही आयुक्त आपल्या हवे तसे काम करत असल्याने लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीचे अधिकार कमी करण्याचे काम केले होते. आयुक्तांनीही याचा फायदा उठवत लोकप्रतिनिधींना डावलून मुख्यमंत्री यांची मर्जी राखण्यासाठी काम केले होते.

(हेही वाचा – BMC : मुंबईतील प्रत्येक भागांमधील पावसाची नोंद होणार अचूक; कारण महापालिकेने उचलले ‘हे’ पाऊल)

आता राज्यात ठाकरे सरकार जावून शिंदे-फडणवीस यांचे सरकार आले. परंतु ठाकरे सरकारच्या काळात आज जे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे नगरविकास खाते होते. नगरविकास खात्याच्या अखत्यारीत महापालिका येत असतानाही केवळ मुख्यमंत्री यांचे आशीर्वाद असल्याने चहल यांनी शिंदे यांनाही तेव्हा तुच्छ पणाची वागणूक दिली होती. त्यामुळे शिंदे यांनी जेव्हा मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा चहल यांना, आता तर माझे ऐकावेच लागेल अशा शब्दात सुनावले. आता शिंदे मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांना कुठे नेऊ आणि कुठे ठेवू अशी अवस्था चहल यांची झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाचे लोकसभेतील गटनेते खासदार राहुल शेवाळे यांची विशेष काळजी घेतली जात आहे. परंतु आता मुंबईतील विकास कामे आणि लोकांच्या समस्या घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे महापालिकेत येऊ लागल्याने मुख्यमंत्री यांच्या सारखाची वागणूक त्यांना दिली जात आहे. श्रीकांत शिंदे हे दोन दिवसांपूर्वी महापालिका मुख्यालयात आले असता चहल हे त्यांचे स्वागत करण्यासाठी इमारतीच्या तळापर्यंत गेले होते. आणि बैठक संपल्यानंतर सोडायलाही गेले होते. अशाच प्रकारची वागणूक आदित्य ठाकरे यांना मिळायची. त्यामुळे कालपर्यंत मुख्यमंत्री यांच्याजवळ शेवाळे असले तरी मुख्यमंत्री यांच्या पुत्राचा विश्वास संपादन केल्यास इतर कुणाला अधिक मान देण्याची गरज नाही, ही कला अवगत असल्याने चहल यांनी आता शिवसेनेच्या इतर पदाधिकारी यांना फाट्यावर मारण्यास सुरुवात केली आहे. श्रीकांत शिंदे यांची बैठक संपल्यानंतर पश्चिम उपनगरातील त्यांच्या पक्षाच्या आमदाराने त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी चौरे यांना भेटा असे सांगून त्यांना भेटण्याचे टाळले. त्यामुळे त्या आमदाराचा चेहरा पहाण्यासारखा झाला होता. त्यामुळे ठाकरे सरकारचा फॉर्म्युला आता चहल हे शिंदे यांच्या बाबतही राबवायला लागल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काही सूत चहल यांच्याशी जुळत नसून त्यांचे सूत मुख्यमंत्री यांच्यासोबत जुळल्याने फडणवीस यांना चहल हा विषय बाजूला टाकल्याचे बोलले जात आहे. फडणवीस हे चहल यांना विचारत नसल्याने आयुक्त हे भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार आशिष शेलार, खासदार मनोज कोटक, गोपाळ शेट्टी, पूनम महाजन यांना विशेष वेळ देऊन त्यांची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही बोलले जात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.