पावसाळ्यातील आपत्तींचा सामना करण्यासाठी मुंबई महागरपालिकेच्या मुख्य आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षासह (Emergency Control Room) २४ विभाग कार्यलयातील विभागीय नियंत्रण कक्ष हे यंदाच्या पावसाळ्यापासून पूर्ण क्षमतेने मनुष्यबळासह सज्ज झाले आहेत. त्यामुळे आता स्थानिक पातळीवरच विभागीय नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून आपत्कालीन समस्यांवर उपाययोजना केल्या जाणार असून मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाच्या मार्गदर्शन आणि देखरेखी खाली हे सर्व विभागीय कक्ष विभागातील समस्या निवारणाचा प्रयत्न करणार आहे.
(हेही वाचा – हेल्पलाईनवरील केवळ ७० टक्केच कचऱ्याच्या तक्रारी सोडवता आल्या महापालिकेला)
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या निर्देशांनुसार महानगरपालिकेच्या मुख्य आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या (Emergency Control Room) धर्तीवर सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये विभागीय नियंत्रण कक्ष प्रथमच स्वतंत्र मनुष्यबळासह सुसज्ज करण्यात आले आहेत. महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाने यंदाच्या पावसाळ्यासाठी विविध यंत्रणांसोबत सुसज्जतेसाठी समन्वय साधला असून ‘मान्सुन – २०२३’ सुसज्जतेबाबत महानगरपलिकेद्वारे सर्वस्तरिय कार्यवाही करण्यात आली आहे, अशी माहिती महानगरपालिका प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.
पुराची माहिती देणारी आयफ्लोज (IFLOWS) प्रणाली कार्यन्वित!
यंदाच्या पावसाळ्यासाठी मुंबईतील नागरिकांच्या सुविधेसाठी आयफ्लोज (IFLOWS) प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. महानगरपालिकेचा आपत्कालीन (Emergency Control Room) व्यवस्थापन विभाग आणि राष्ट्रीय समुद्रीतट संशोधन केंद्र यांच्यामार्फत संयुक्तरित्या पूर प्रवण क्षेत्राची आगाऊ सूचना देणारी ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यासोबतच नागरिकांच्या मदतीसाठी आपत्कालीन कक्षासोबत संपर्क साधण्यासाठीच्या हॉटलाईन्स, आपत्कालीन परिस्थितीत तात्पुरता निवारा, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक आणि मोबाईल एप यासारख्या सुविधाही नागरिकांसाठी महानगरपालिका प्रशासनाकडून उपलब्ध देण्यात आल्या आहेत. त्यासोबतच २४ प्रशासकिय कार्यालयांमध्ये ‘विभागीय नियंत्रण कक्ष’ कार्यान्वित करण्यात आली आहे.
मुख्य नियंत्रण कक्षात ५८ हॉट लाईन्सची सुविधा ही महानगरपालिकेची २४ प्रशासकीय विभाग कार्यालये, ६ मोठी रुग्णालये व २८ बाह्य यंत्रणांना जोडण्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहे. मुंबई पोलीसांमार्फत मुंबईत बसविण्यात आलेल्या ५३६१ सिसिटीव्ही कॅमे-यांचे थेट प्रक्षेपण पहाण्याकरिता व्हिडीओ वॉलची सुविधा आपत्कालीन कक्षात (Emergency Control Room) उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच आपत्ती प्रसंगी वाहतूक व्यवस्था कोलमडल्यास विविध रेल्वे स्थानकांवर अडकून पडलेल्या प्रवाशांकरिता, तसेच आपत्तीमुळे बेघर झालेल्या नागरिकांकरिता तात्पुरते आश्रय मिळावा म्हणून निवाऱ्याची व्यवस्था करण्याच्या सूचनाही सह आयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत यांनी दिल्या आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community