जळगाव, अकोला, धुळे, नागपूर, नाशिक, अमरावती, अहिल्यानगर कोकण मिळून महाराष्ट्रातील एकूण ११४ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील १८ मंदिरांचा समावेश आहे, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी दिली.
महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने ९ जून रोजी मुंबईमधील शीतलादेवी मंदिरात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जीएसबी टेम्पल ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण कानविंदे, जीवदानी मंदिराचे अध्यक्ष प्रदीप तेंडोलकर, कडव गणपती मंदिराचे विश्वस्त (कर्जत) विनायक उपाध्याय, केरलीय क्षेत्रपरिपालन समितीचे आचार्य पी.पी. एम्. नायर आदी उपस्थित होते. वस्त्रसंहिता लागू करण्यात येणाऱ्या मंदिरांच्या नावांची घोषणा या वेळी घनवट यांनी केली.
महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने ७ जून रोजी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये मुंबई, ठाणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांतील मंदिरांच्या ट्रस्टींची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला उपस्थित सर्व मंदिरांच्या ट्रस्टींनी मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा ठराव एकमताने संमत केला. वर्ष २०२० मध्ये महाराष्ट्र शासनाने मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये वस्त्रसंहिता लागू केली. यामध्ये ‘जीन्स पॅंट’, ‘टी-शर्ट’, भडक रंगांचे कपडे यांवर बंदी घालण्यात आली आहे. ही वस्त्रसंहिता लागू करण्यामागे जनमानसांत शासकीय प्रतिमा बिघडू नये, हा सरकारचा हेतू होता. देशातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, मशिदी आणि अन्य प्रार्थनास्थळे, खाजगी आस्थापने, शाळा-महाविद्यालय, न्यायालय, पोलीस आदी सर्वच क्षेत्रांत वस्त्रसंहिता लागू आहे. त्याप्रमाणे मंदिरांमध्येही वस्त्रसंहिता असावी, असे सुनील घनवट यांनी म्हटले.
काहीजण मंदिरांमध्ये अंगप्रदर्शन करणाऱ्या, उत्तेजक, अशोभनीय, असभ्य, फाटलेल्या जीन्स आणि तोकड्या कपड्यांमध्ये येतात. सात्त्विक वेशभूषा परिधान करून मंदिरात आल्यावर भक्तांना मंदिरातील चैतन्याचा लाभ होतो, तसेच मंदिरातील पावित्र्य, मांगल्य, परंपरा आणि संस्कृती टिकून रहाते, अशी हिंदु धर्मांची शिकवण आहे. यासाठीच मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय मंदिर विश्वस्तांनी स्वयंस्फूर्तीने घेतला आहे. हा केवळ प्रारंभ आहे. भविष्यात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर वा जिल्ह्यांतील आणखीही काही मंदिरे वस्त्रसंहिता लागू करणार असल्याचे जीएसबी टॅम्पल ट्रस्टचे मानद चिटणीस आणि विश्वस्त शशांक गुळगुळे यांनी सांगितले.
या मंदिरांमध्ये सात्विक वस्त्रसंहिता
आतापर्यंत १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले उज्जैनचे श्री महाकालेश्वर मंदिर, महाराष्ट्रातील श्री घृष्णेश्वर मंदिर, अंमळनेर येथील श्रीदेव मंगळग्रह मंदिर, वाराणसीचे श्री काशी विश्वेश्वर मंदिर, आंध्रप्रदेशचे श्री तिरुपती बालाजी मंदिर, केरळचे विख्यात श्री पद्मनाभस्वामी मंदिर, कन्याकुमारीचे श्री माता मंदिर अशा काही प्रसिद्ध मंदिरांमध्ये अनेक वर्षांपासून सात्विक वस्त्रसंहिता लागू आहे. गोव्यातील बहुतांश मंदिरांसह ‘बेसिलिका ऑफ बॉर्न जीसस’ आणि ‘सी कैथ्रेडल’ या मोठ्या चर्चमध्येही वस्त्रसंहिता लागू आहे.
वस्त्रसंहिता लागू करणारी मुंबई महानगरातील मंदिरे
1. श्री शांतादुर्गा देवस्थान, श्री शीतलादेवी देवस्थान, माहीम
2. श्री मुरलीधर देवस्थान, माहीम
3. श्री अष्टविनायक देवस्थान, पाली
4. श्री जीवदानी मंदिर, विरार
5. श्री भुलेश्वर देवस्थान, भुलेश्वर
6. श्री बालाजी रामजी देवस्थान, भुलेश्वर
7. श्री दिवानेश्वर महादेव मंदिर, वसई
8. श्री परशुराम तपोवन आश्रम, वसई
9. श्रीराम मंदिर, धारावी
10. श्री मुरलीधर मंदिर, शीव
11. हनुमान मंदिर, डोंबिवली (पूर्व)
12. श्रीराम मंदिर, दावडी, डोंबिवली (पूर्व)
13. कडव गणपती मंदिर, कर्जत
14. श्रीराम मंदिर, नागोठणे
15. श्री जब्रेश्वर महादेव मंदिर, बाणगंगा
16. श्री वाळुकेश्वर देवस्थान, बाणगंगा
17. श्री दत्त मंदिर, माहीम
18. झावबा श्रीराममंदिर, गिरगाव
हेही पहा –
Join Our WhatsApp Community