गेल्या काही दिवसांपासून सातत्याने नाराजीचे सूर आळवणाऱ्या पंकजा मुंडे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नांदेड मधील सभेला पंकजा यांना व्यासपीठावर खुर्ची आणि भाषणाची संधी दिली जाणार असल्याचे कळते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शनिवारी, १० जून रोजी नांदेडमध्ये सभा होत आहे. भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर यांनी गेल्यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पराभव करून नांदेड लोकसभा जिंकली असली, तरी कालानुरूप परिस्थिती बदलली आहे. केसीआर यांच्या पक्षानेही नांदेडमध्ये प्रवेश केल्याने दुहेरी आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी अमित शहा सभा घेत आहेत.
दरम्यान, या सभेच्या निमित्ताने मराठवाड्यातील नेत्यांची मोट घट्ट बांधून ठेवण्याचा प्रयत्नही केला जाणार आहे. त्यामुळेच नाराज पंकजा यांना व्यासपीठावर स्थान दिले जाणार असल्याचे कळते. गेल्या काही दिवसांमध्ये दोन वेळा पंकजा मुंडे यांनी त्यांची खदखद व्यक्त केली होती. लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. नांदेडमध्ये हा योग जुळून येण्याची शक्यता आहे. सभेपूर्वी किंवा नंतर या दोघांत चर्चा होणार का? किंवा सभेत पंकजा मुंडे अमित शहा यांच्यासमोर त्यांची नाराजी व्यक्त करणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
जाहीर नाराजी
दिल्लीत झालेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या कार्यक्रमात नितीन गडकरी आणि रासपचे नेते महादेव जानकर यांच्या उपस्थितीत पंकजा यांनी त्यांची नाराजी उघड केली होती. त्यावेळी आपण भाजपाचे आहोत, मात्र भाजपा आपला पक्ष नाही असे त्या म्हणाल्या होत्या. अगदीच गरज पडली तर भावाच्या घरात; म्हणजेच जानकरांच्या पक्षात जाण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर राज्यात त्यांच्या नाराजीची चर्चा झाली. गोपीनाथ गडावर झालेल्या कार्यक्रमातही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
सर्वपक्षीयांकडून निमंत्रण
पंकजा यांनी निवडणुकांच्या तोंडावर नाराजी व्यक्त केल्यानंतर ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी त्यांची भेटही घेतली होती. त्यानंतर पंकजा मुंडे निर्णयाच्या उंबरठ्यावर असल्याचे मानण्यात येत आहे. आता अमित शहा त्यांची नाराजी दूर करतील का, या प्रश्नाचं उत्तर नांदेडच्या सभेच्या काळात मिळण्याची शक्यता आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community