शिवसेना उबाठाच्या दबावात भाई जगताप यांची उचलबांगडी?; मुंबई काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा

175
शिवसेना उबाठाच्या दबावात भाई जगताप यांची उचलबांगडी?; मुंबई काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा
शिवसेना उबाठाच्या दबावात भाई जगताप यांची उचलबांगडी?; मुंबई काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी आमदार वर्षा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे वर्षा गायकवाड आता दिवंगत वडील एकनाथ गायकवाड यांची गादी चालवण्याचा प्रयत्न करणार आहेत. काँग्रेसच्या हायकमांडकडून याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी गुजरात, पुद्दुचेरी आणि मुंबई या प्रदेशांकरिता नव्या अध्यक्षांची नेमणूक केली आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप होते. त्यांची या पदावरून आता उचलबांगडी करण्यात आली असून आमदार वर्षा गायकवाड या मुंबई प्रदेश काँग्रेसच्या नवनिर्वाचित अध्यक्ष असतील. दरम्यान मुंबई महानगरपालिकेसह आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीसाठी सामाजिक समतोल राखण्याच्या उद्देशाने काँग्रेस नेतृत्वाने वर्षा यांच्या रुपाने दलित महिलेचे कार्ड खेळले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी कुणबी मराठा समाजाचे नाना पटोले आहेत. त्यामुळे मुंबईसाठी इतर समाजाला संधी मिळावी, अशी मागणी होत होती. मुंबईसाठी मुस्लिम चेहऱ्यावरही काँग्रेस हायकमांडने विचार केला. मात्र, वर्षा गायकवाड यांनी या शर्यतीत बाजी मारली. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष पदासाठी मोठी रस्सीखेच सुरू होती. परंतु बाजी मारली वर्षा गायकवाड यांनी त्यामुळे ज्यांना हे पद मिळवता आले नाही ते आणि त्यांचे समर्थक वर्षा गायकवाड यांना सहकार्य करतील का? याच उत्तर येणाऱ्या निवडणुकीचे निकालच देतील.

(हेही वाचा – नाल्यांच्या बांधकामांपासून ते नालेसफाईपर्यंतच्या कामांवर १८ महिला अभियंत्यांचे लक्ष)

वर्षा गायकवाड यांची नियुक्तीची घोषणा झाल्यानंतर मुंबई प्रदेशचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी आनंद व्यक्त केला आहे आणि यापुढेही आपण पूर्ण साथ देणार असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. पण तरी देखील या पुढील काळात वर्षा गायकवाड यांना मुंबई काँग्रेसमध्ये असलेल्या अंतर्गत वादामुळे किती फटका पडेल हे देखील पहावे लागेल. वर्षा गायकवाड या मुंबईतील धारावी मतदारसंघातून आतापर्यंत चार वेळा निवडून आलेल्या आहेत. असे असले तरी येणारी मुंबई महापालिका निवडणूक डोळ्या समोर ठेवून एक महिला आणि त्यातही दलित कार्ड खेळण्याचा हाय कमांडचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. मुंबई काँग्रेसमध्ये पूर्वीपासून मुरली देवरा गटाचा नेहमीच धबधबा होता. त्यामुळेच मुरली देवरा यांनी बराच काळ मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवत राहिले. याच कारणामुळे नेहमीच मुरली देवरा यांच्या पश्चात मुंबई काँग्रेसचा जो कोणी अध्यक्ष होईल तो देवरागटाचा असावा असे काँग्रेस समर्थक समजत होते. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी स्वतंत्र मुंबई महापालिका निवडणूक लढण्याचे बोलून दाखवून महाविकास आघाडीमध्ये बेबनाव असल्याचे वारंवार समोर आले आहे. त्यामुळेच की काय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा दबाव असल्याकारणानेच भाई जगताप यांना बाजूला करून वर्षा गायकवाड यांची नियुक्ती झाल्याचे दबक्या आवाजात काँग्रेसमध्ये बोलले जात आहे.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी मुंबई काँग्रेसमध्ये हा बदल करण्यात आला आहे. भाई जगताप यांच्या जागी वर्षा गायकवाड यांना संधी देऊन काँग्रेसने आगामी महापालिकेसह, लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी दलित महिला कार्ड खेळल्याचे स्पष्ट झाले आहे.

नाना पटोले टेन्शनमध्ये

मुंबई अध्यक्ष बदलल्यानंतर प्रदेशाध्यक्षपदावरून नाना पटोलेही लवकरच जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. पटोले यांच्या नेतृत्वाबाबत राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या तक्रारी आहेत. गेल्याच आठवड्यात अशोक चव्हाण यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. यानंतर पटोले यांच्याऐवजी सर्वांना सोबत घेऊन काम करणाऱ्या चव्हाण यांच्याकडे पुन्हा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची चर्चा काँग्रेसच्या गोटात सुरू आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.