मुंबई महापालिकेच्यावतीने आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता कराच्या वसुलीसाठी करनिर्धारण व संकलन विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत धडक कारवाई सुरु असून कर थकवल्याप्रकरणी ४२ भूखंडांची लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यातून महापालिकेला २१० कोटी रुपये येणे असल्याची माहिती करनिर्धारण व संकलन विभागाच्या सहायक आयुक्त संगीता हसनाळे यांनी दिली आहे. लिलावात गेलेल्या या भूखंडांमध्ये सुमेर असोशिएट्स, सुमेर बिल्डर, लोखंडवाला कोठारीया, वंडरव्ह्यू रिऍलिटी डेव्हलपर आदी विकासकांचा समावेश आहे.
३ हजार ८०० कोटींपेक्षा अधिक मालमत्ता कर जमा
आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये रुपये ५ हजार २०० कोटी मालमत्ता कर जमा करण्याचे महानगरपालिकेचे लक्ष्य असून आजपर्यंत रुपये ३ हजार ८०० कोटींपेक्षा अधिक मालमत्ता कर जमा झाला आहे. या कारवाईमध्ये चालू आर्थिक वर्षात ११ हजार ६६१ ठिकाणी अटकावणीची कारवाई करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त ४७९ ठिकाणी जल-जोडणी खंडित करण्यात आली आहे. तर अनेक ठिकाणी वाहन जप्तीसह, कार्यालयातील वस्तूंचीही जप्ती करण्यात आली आहे.
(हेही वाचा : वाढत्या कोरोना रुग्णांमुळे सरकारची डोकेदुखी वाढली!)
४२ भूखंडाची लिलाव प्रक्रियेला सुरुवात
तर ४२ भूखंडाच्या लिलावाची प्रक्रियाही सुरु करण्यात आली आहे. या लिलाव प्रकरणातून महापालिकेस २१० कोटी रुपये इतके येणे आहे. यात प्रामुख्याने मे. सुमेर असोसिएटर यांच्याकडे ५३.४३ कोटी, मे. सुमेर बिल्डर प्रा.लि. कडे २९.७१ कोटी, मे. लोखंडवाला कोठारीयाकडे १३.५५ कोटी, वंडरव्हॅल्यू रिऍलिटी डेव्हलपर लिमिटेडकडे १४.६५ कोटी थकित आहेत. अशा सर्वांकडून वसुलीची प्रक्रिया त्यांच्या भूखंडाचा लिलाव करून वसूल करण्यासाठीची प्रक्रिया सुरू केलेली आहे.
यांच्यावर केली कारवाई!
‘एच पूर्व’ विभाग कार्यक्षेत्रातील वांद्रे पूर्व परिसरात असणाऱ्या मे. एमआयजी सहकारी गृहरचना संस्था (विकासक मे. डी.बी. रिऍलिटी) यांच्यावर ६६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या अनुषंगाने वारंवार विनंती करुन व नोटीस बजावून देखील मालमत्ता कराचा भरणा करण्यात आला नाही. त्यामुळे संबंधित मालमत्ता धारकाचे वाहन जप्त व स्थानबद्ध करण्यात आले आहे. ‘एच पूर्व’ विभाग कार्यक्षेत्रातील वांद्रे पूर्व परिसरातील एका बहुमजली इमारतीत मे. महाराष्ट्र थिएटर प्रा. लि. (मे.आर.एन.ए.कॉर्पोरेट) यांचे कार्यालय आहे. या मालमत्ताधारकांकडे रुपये २१ कोटींची मालमत्ता कराची थकबाकी होती. याबाबत वारंवार विनंती करुन व नोटीस बजावून देखील मालमत्ता कराचा भरणा करण्यात आला नाही. या अनुषंगाने सदर मालमत्ता धारकांच्या आठव्या मजल्यावरील कार्यालयातील साहित्य जप्त करण्यासह त्यांच्या अखत्यारीतील तळमजल्यावर अटकावणीची (सिलिंग) कार्यवाही करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community