भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनच्या ओव्हल मैदानात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनलचा सामना रंगला. ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी ४४४ धावांचे तगडे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना भारताच्या फलंदाजांनी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, कर्णधार रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेसारख्या फॉर्ममध्ये असलेल्या फलंदाजांना बाद करण्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना यश आले. त्यामुळे अखेर भारताला पराभवाचा सामना करावा लागला.
शेवटच्या दिवशी स्कॉट बोलॅंडने एकाच षटकात विराट कोहली आणि रवींद्र जडेजाला बाद केले आणि ऑस्ट्रेलियाला विजयाच्या दिशेने नेले. कांगारु गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे भारताचा संपूर्ण डाव ६३.३ षटकात २३४ धावांवर आटोपला. भारताला सर्वबाद करून ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये विजयी झेंडा फडकवला. त्यामुळे आयसीसीच्या या टूर्नामेंटमध्ये भारताचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला.
(हेही वाचा wtc final 2023 ind vs aus india : भारताला ‘अजिंक्य’ होणे शक्य! ‘विराट’ खेळीची आवश्यकता; इतिहास आहे साक्षी)
भारतासाठी कर्णधार रोहित शर्माने (४३), शुबमन गिल (१८), चेतेश्वर पुजारा (२७), विराट कोहली (४९), अजिंक्य रहाणे (४६), रवींद्र जडेजा (०), श्रीकर भरत (२३), शार्दूल ठाकूर (०), उमेश यादव (१), मोहम्मद शमी (१३) आणि मोहम्मद सिराजने फक्त एक धाव केली. ऑस्ट्रेलियासाठी स्कॉट बोलॅंडने अप्रतिम गोलंदाजी करून ३ विकेट्स घेतल्या. मिचेल स्टार्कने २ विकेट घेतल्या. तर नेथन लायनला ४ विकेट्स घेण्यात यश आले पण कर्णधार पॅट कमिन्सला या इनिंगमध्ये एका विकेटवर समाधान मानावे लागले.
Join Our WhatsApp Community