राष्ट्रवादीच्या फेरबदलावरून सामनातून शरद पवार आणि अजित पवारांवर निशाणा

200
राष्ट्रवादीच्या फेरबदलावरून सामनातून शरद पवार आणि अजित पवारांवर निशाणा
राष्ट्रवादीच्या फेरबदलावरून सामनातून शरद पवार आणि अजित पवारांवर निशाणा

नुकताच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी पक्षाध्यक्ष शरद पवारांनी पक्षात काही बदल केले. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातील अग्रलेखातून शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. ‘राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या वर्धापनदिनी शरद पवार यांनी पक्षात काही बदल केले. त्यात धक्कादायक वगैरे काहीच दिसत नाही. शरद पवारांनी राष्ट्रवादी पातळीवर दोन प्रमुख नियुक्ता केल्या. राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती केली. यास काही जण शरद पवारांनी भाकरी फिरवली असे म्हणत असतील तर त्यात दम नाही. मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय दर्जा गमावला आहे. नागालॅण्डमध्ये त्यांचे चार-पाच आमदार निवडून आलेत. राज्याबाहेर लक्षद्वीप येथे त्यांचा एक खासदार आहे. केरळ विधानसभेत त्यांचे एक-दोन सदस्य आहेत. बाकी सर्व कारभार महाराष्ट्रात आहे. त्यामुळे सर्व काही आटोपशीर आहे. मग एकाच वेळी दोन कार्यकारी अध्यक्ष नेमण्याची गरज का पडली ?,’ असा सवाल करत सोमवारच्या सामनाच्या अग्रलेखातून लिहून राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे.

दुसरे कार्यकारी अध्यक्ष पटेल यांना नेमून पवार कोणता संदेश देत आहेत?

पुढे सामनातून म्हटले आहे की, ‘राष्ट्रवादी हा पक्ष तसा आटोपशीर असला तरी त्या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे देशातले बलदंड राजकीय पुरुष आहेत व देशाच्या राजकारणात त्यांच्या शब्दाला मान आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूगर्भात असंतोषाचा लाव्हा उसळत होता व त्याचा केंद्रबिंदू अजित पवार असल्याचे माध्यमांचे म्हणणे आहे. शरद पवार यांनी साधारण महिनाभरापूर्वी त्यांच्या आत्मचरित्र प्रकाशन सोहळय़ात पक्षाच्या अध्यक्षपदातून मुक्त होण्याची घोषणा केली व तेव्हा सगळ्यांना एकच झटका बसला. तसा झटका सुप्रिया पटेलांच्या नव्या नियुक्तीने बसला नाही. सुप्रिया सुळे यांच्याकडेच पक्ष संघटनेची सूत्रे जातील हे नक्की होते, पण दुसरे कार्यकारी अध्यक्ष पटेल यांना नेमून पवार कोणता संदेश देत आहेत? सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्षपदी नेमल्याने घराणेशाहीचा आरोप होऊ नये यासाठी त्यांनी आणखी एक कार्यकारी अध्यक्ष नेमला असावा, पण प्रफुल्ल पटेल हे जुने सहकारी आहेत व त्यांचा वावर महाराष्ट्रापेक्षा दिल्लीतच जास्त असतो.’

(हेही वाचा –शरद पवार धमकी प्रकरणी पुण्यातील एका आयटी इंजिनिअरला अटक; १३ जूनपर्यंत पोलीस कोठडी

अजित पवारांविषयी काय म्हटले…

‘अजित पवार यांना नव्या फेररचनेतून वगळले. त्यामुळे ते दिल्लीतील कार्यक्रमातून निघून गेले वगैरे नेहमीच्या कंड्या पिकविण्यात आल्या. अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातले ‘खिलाडी’ आहेत व राज्याच्या बाहेर पडून काम करण्याचा त्यांचा पिंड नाही. सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष करावे ही आपलीच सूचना होती असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. अजित पवार हे विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत व त्यांच्या नेतृत्वाखालचा गट हा भाजपच्या दगडावर पाय ठेवून आहे असे नेहमीच सांगितले जाते. अडीचेक वर्षांपूर्वी त्यांनी फडणवीस यांच्याबरोबर पहाटेचा शपथविधी केल्याचा हा परिणाम. अजित पवार हे भाजपच्या तंबूत जाऊन परत आले हा त्यांच्यावर ठपका आहे व हा ठपका कायमचा दूर करण्यासाठी अजित पवारांनाच शर्थ करावी लागेल. राजकारणातल्या विश्वासार्हतेला सध्या कमालीची घरघर लागली आहे. सकाळी या पक्षात असलेला नेता संध्याकाळी कोठे विलीन झालेला असेल ते सांगता येत नाही. काही लोक यास राजकीय बुद्धिबळाचा पट समजतात. उंट तिरका चालतो, पण या पटावर त्यास घोडाप्रमाणे अडीच घरेही जबरदस्तीने चालवले जाते. अशा प्रकारच्या राजकारणाचा लोकांना कंटाळा आला आहे.’

‘महाराष्ट्राच्या राजकारणात नेमके तेच घडत आहे. याच राजकारणात शरद पवार व त्यांचा पक्ष हे एक महत्त्वाचे घटक आहेत हे नक्कीच मान्य करावे लागेल व त्यामुळेच भविष्यातील राजकारणाचा विचार करून शरद पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काही प्यादी हलवली आहेत. नव्या रचनेत कार्यकारी अध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी आली आहे. दुसरे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल मध्य प्रदेश, गुजरात, गोवा, राजस्थान वगैरे प्रदेश पाहतील. सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, योगानंद शास्त्री, मोहम्मद फैजल अशांना सरचिटणीस नेमून त्यांच्यावर इतर काही राज्यांची जबाबदारी दिली. हे सर्व कागदावरच राहील. तटकरे यांच्यावर सरचिटणीस म्हणून प. बंगाल, ओडिशाची जबाबदारी आहे. शिवाय अल्पसंख्याक व शेतकरी विभागाचे ते प्रभारी बनवले आहेत. हे सर्व राष्ट्रीय पातळीवर करण्याची मानसिकता तटकरे यांची आहे काय?’, असा सवालही सामनातून करण्यात आला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.