Boxing : शासन निर्णयामध्ये ‘युवा’ उल्लेख नसल्याचे कारण देत सुवर्णपदक विजेत्या बॉक्सरना डावलले

महाराष्ट्राच्या क्रीडा विभागाच्या धोरणावर क्रीडा क्षेत्रातून तीव्र नाराजी व्यक्त.

321

शासन निर्णयामध्ये (जीआर) ‘युवा’ असा उल्लेख नसल्याचे कारण देत राज्य सरकारने जागतिक कीर्तिच्या बॉक्सरना वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे पोलंड आणि स्पेनमध्ये ‘युथ वर्ल्ड चॅम्पियनशिप’ जिंकणाऱ्या (सुवर्णपदक) या बॉक्सरना हक्काच्या सवलती आणि बक्षिसाच्या रकमेपासून वंचित रहावे लागत आहे. तेलंगणा सरकारने मात्र आपल्या राज्यातील बॉक्सरसोबत असा कोणताही भेद न करता तब्बल ५० लाखांची रक्कम देऊ केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या क्रीडा विभागाच्या धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करून राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या राज्यातील क्रीडापटूंना शासनातर्फे बक्षिस स्वरूपात रोख रक्कम आणि विविध सवलती दिल्या जातात. त्यात सरकारी नोकरीसह अन्य सवलतींचा समावेश आहे. शासनाच्या क्रीडा धोरणानुसार बॉक्सिंग हा क्रीडा प्रकारही त्यात मोडतो आणि या खेळात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या बॉक्सरना उपरोक्त सवलती लागू होतात. परंतु, राज्याच्या क्रीडा विभागाने २०१६ मध्ये जाहीर केलेल्या शासन निर्णयात ‘युवा’ असा उल्लेख नसल्यामुळे ‘युथ वर्ल्ड चॅम्पियनशिप’ जिंकणाऱ्या (सुवर्णपदक) बॉक्सरना बक्षिसाची रक्कम आणि हक्काच्या सवलतींपासून डावलण्यात आले आहे.

(हेही वाचा Biparjoy Cyclone : बिपरजॉय चक्रीवादळाने घेतले ४ बळी; जुहू समुद्रकिनारी ६ जण बुडाले)

मूळ नागपूरची असलेल्या अल्फिया खान पठाण या युवा बॉक्सरने २०२१मध्ये पोलंड येथे ‘युथ वर्ल्ड चॅम्पियनशिप’ जिंकली आणि वर्ल्ड बेस्ट बॉक्सर हा किताबही पटकावला. त्या पाठोपाठ पुण्याच्या देविका घोरपडेनेही २०२२ मध्ये स्पेन येथे ‘युथ वर्ल्ड चॅम्पियनशिप’ जिंकली. जागतिक पातळीवर चमकदार कामगिरी करणाऱ्या या दोन्ही तरुणी शासनाच्या सवलती आणि बक्षिस रकमेस पात्र आहेत. परंतु, जीआरमध्ये ‘युवा’ असा उल्लेख नसल्यामुळे या दोघींना उपरोक्त सवलती आणि बक्षिसाची रक्कम नाकारण्यात आली आहे. खेळाडूंबाबत शासकीय स्तरावर सुरू असलेल्या भेदभावाबाबत अल्फियाचे वडील अक्रम खान पठाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

तेलंगणा सरकारने केली भरघोस मदत

२०११ मध्ये ‘युथ वर्ल्ड चॅम्पियनशिप’ जिंकणाऱ्या तेलंगणाच्या निकत झरीन या युवा बॉक्सरला तेथील सरकारने तात्काळ ५० लाखांची मदत जाहीर केली. शिवाय शासनाचा ब्रॅण्ड अॅम्बेसडर म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यानंतर २ कोटी रुपये आणि घरासाठी जागाही देण्याचा निर्णय घेण्यात आला. एकीकडे तेलंगणा सरकार आपल्या युवा क्रीडापटूंचा यथोचित सन्मान करीत असताना, महाराष्ट्र सरकार मात्र जीआरकडे बोट दाखवत शब्दांचा खेळ करीत असल्याची टीका क्रीडाप्रेमींकडून केली जात आहे.

मुख्यमंत्र्यांकडून आश्वासनपूर्तीची अपेक्षा – रणजित सावरकर

‘युथ वर्ल्ड चॅम्पियनशिप’ जिंकणाऱ्या युवा बॉक्सरसोबत घडलेला संपूर्ण प्रकार मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातला आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, यासंदर्भात तातडीने कार्यवाही करून बॉक्सरचा यथोचित सन्मान केला जाईल, असे आश्वासन दिले आहे. वेगवान निर्णयासाठी परिचित असलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून आश्वासनपूर्तीची अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष रणजित सावरकर यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.