G-20 : जी-२० प्रतिनिधींनी घेतले पालखीचे दर्शन; ‘याची देही याची डोळा’ अनुभवला पालखी सोहळा

161

जी-२० ‘डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगट’ बैठकीसाठी पुण्यात उपस्थित देश विदेशातील प्रतिनिधींनी पालखी सोहळ्याला हजेरी लावत ‘याची देही याची डोळा’ महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा अनुभवली. यावेळी काही प्रतिनिधींनी श्री संत तुकाराम महाराज पालखीचे मनोभावे दर्शन घेतले.

पालकमंत्री चंदकांत पाटील यांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराज पादुका मंदिरजवळ फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वार येथे जी-२० प्रतिनिधींसाठी पालखी सोहळा अनुभवण्यासाठी मंडप उभारून प्रशासनाच्या आणि पुणे महानगर पालिकेच्यावतीने व्यवस्था करण्यात आली होती. पालकमंत्री पाटील यांनी प्रतिनिधींचे स्वागत केले. यावेळी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, मनपा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आदी उपस्थित होते.

प्रारंभी ढोल ताशाच्या गजरात आणि तुळशीमाळा, वारकरी उपरणे, टोपी घालून प्रतिनिधींचे स्वागत करण्यात आले. यावेळी पालखी रस्त्यावरून दिंड्यांचे आगमन होऊ लागले. हाती भगव्या पताका, महिला वारकऱ्यांच्या डोक्यावर तुळशीची रोपे, कपाळाला टिळा, टाळ, मृदंग, वीणा वादनात, ‘राम कृष्ण हरी’, ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ जयघोषात, अभंग गायनात, फुगडी, नर्तनात दंग वारकरी पाहून प्रतिनिधी वेगळ्याच अनुभवात दंग झाले. यावेळी काही प्रतिनिधींनी वारकऱ्यांकडून कपाळाला टिळा लावून घेतला.

(हेही वाचा Muslim : हिजाबची सक्ती आणि धर्मांतर करणाऱ्या ‘या’ राज्यातील शाळांवर चालणार बुलडोझर )

ढोल ताशाच्या तालावर काही प्रतिनिधी नर्तनात दंग झाले. काही प्रतिनिधींनी उत्साहाने वारकऱ्यांसोबत फुगडीचा फेर धरला. महिला प्रतिनिधींनी डोक्यावर तुळशीची रोपे घेतली. सर्वच जण आपल्या मोबाईलमधून वारीची छायाचित्रे काढून घेण्यात दंग झाले. प्रतिनिधींनी वारकऱ्यांना भारतीय पद्धतीने नमस्कार करत स्वागत केले. तत्पूर्वी केशव शंखनाद पथकाद्वारे करण्यात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण शंखनादाचा तसेच ढोल पथकाच्या ढोल वादनाने वातावरणात जोश आणला.

परदेशी प्रतिनिधींनी घेतले संत तुकाराम महाराज पालखीचे दर्शन

यावेळी दिंड्यांच्या शिस्तबद्ध रांगा पुढे सरकत असताना श्री संत तुकाराम महाराज पालखीचे आगमन झाले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील पालखीच्या दर्शनासाठी गर्दीतून पुढे जाऊ लागताच काही परदेशी प्रतिनिधीही पालखीच्या दर्शनासाठी सरसावले. यावेळी पालकमंत्री पाटील आणि जी- २० प्रतिनिधींनी भक्तीभावाने पालखीचे दर्शन घेतले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.