मुंबई महापालिकेच्यावतीने मान्सून पूर्व तयारी केली जात असली तरी प्रत्यक्षात नाल्यांवरील झाकणे सुस्थितीत बसण्याबाबत कोणत्याही प्रकारची काळजी घेतली नाही. एलफिन्स्टन येथील डॉ. दीपक अमरापूरकर यांच्या अपघातानंतर महापालिका प्रशासन आजही दक्ष नसून अंधेरी, जोगेश्चरी, कांदिवली आणि बोरीवली या भागांमधील नाल्यांच्या मॅनहोलवरील सिमेंटची तसेच फायबरची झाकणे ही तुटलेल्या अवस्थेत आहेत. तसेच काही ठिकाणी झाकणेच गायब आहेत. परंतु या तुटलेल्या किंवा गायब झालेल्या झाकणांच्या जागी नवीन झाकणे बसवण्याचा प्रयत्न विभाग कार्यालय किंवा पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या माध्यमातून केली जात नाही. त्यामुळे महापालिकेला डॉ. दीपक अमरापूरकर निर्माण करायचा आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
एलफिन्स्टन येथे सन २०१७ मध्ये पावसाच्या तुंबलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने डॉ. दीपक अमरापूकर हे मॅनहोल्समध्ये पडून मृत्यू पावले. त्यानंतर मुलुंडमध्ये गटारात एक महिला पडून जखमी झाली आणि गोरेगावमध्ये नाल्यात पडून एका छोट्या मुलाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर महापालिकेने मुंबईतील पाणी तुंबणाऱ्या जागांचा शोध घेऊन तेथील मॅनहोल्सच्या झाकणांना हात न लावण्याच्या सूचना रहिवाशांना केल्या. तसेच या मॅनहोल्सच्या आतील बाजूस संरक्षक जाळ्यात बसून जरी मॅनहोल्सचे झाकण काढले तरी आतील जाळीमुळे कुणीही आतमध्ये नाल्यात पडले जाणार नाही याची काळजी घेतली गेली. त्यामुळे मॅनहोल्समध्ये जाळ्या बसवण्याचे काम हाती घेतले आणि पर्जन्य जलवाहिनीच्या सुमारे २५ हजार मॅनहोल्सपैंकी ३ हजार मॅनहोल्समध्ये संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या, तर मलनि:सारण विभागाच्या ७५ हजार मॅनहोल्सपैंकी सुमारे दोन हजार मॅनहोल्समध्ये जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मॅनहोल्समध्ये जाळ्या बसवण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
(हेही वाचा – शिवाजी पार्क परिसरातील झाडांच्या फांद्यांच्या छाटणीकडे दुर्लक्ष; फिरण्यास येणाऱ्या लोकांच्या जीवाला धोका)
मात्र, अंधेरी पश्चिम आझाद नगर, अंधेरी पश्चिम जे.पी. रोड, अंधेरी पश्चिम मुन्सी नगर इव्हरशाईन एँबॅसी, जोगेश्वरी पूर्व येथील नटवर नगर दिप्ती इमप्रेस सोसायटी, बोरीवली पश्चिम हरिदास नगर, कल्पना चावला चौक आदी भागांमधील पदपथांवरील असलेल्या गटारांच्या मॅनहोल्सची झाकणेच तुटलेली आहेत. एका बाजूला मुंबईत सौंदर्यीकरणाचे प्रकल्प राबवले जात असताना दुसरीकडे पदपथांवरील मॅनहोल्सची तुटलेली झाकणे बदलली जात नाही. परिणामी पदपथावरून चालणाऱ्या अनेक पादचाऱ्यांचा अपघात होण्याची शक्यता असून पावसाळ्यात याठिकाणी पाणी तुंबल्यास आणि लोकांना चालताना याचा अंदाज न आल्यास या मॅनहोल्समध्ये पडून दुघर्टना घडू शकते, अशी भीती वर्तवली जात आहे.
मुंबईतील प्रत्येक समस्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. परंतु आपल्याकडे अशाप्रकारच्या तक्रारी आल्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून देतो. त्यामुळे किमान आम्ही ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर ते काम तात्काळ व्हायला हवे. तुटलेल्या आणि गायब झालेल्या गटाराच्या मॅनहोल्सचे झाकण बदलणे आवश्यक आहे. परंतु बऱ्याचदा अशा तक्रारीनंतर तुटलेले झाकण बदलले जाते तर काही वेळा याकडे महापालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करतात. सर्वसाधारणपणे अशाप्रकारची तक्रार आल्यानंतर २४ तासांमध्ये गटाराचे झाकण बदलले गेले पाहिजे, पण त्याकडे दुर्लक्ष होते आणि त्यातून अशाप्रकारच्या दुघर्टना होतात. त्यामुळे महापालिकेने किमान पावसाळ्यापूर्वी सर्व रस्त्यांवरील व पदपथांखालील गटारांच्या मॅनहोल्सची झाकणे तपासून ती तुटल्यास अथवा गायब झाली असल्यास त्वरीत बदलावी. जेणेकरून संभाव्य धोका टाळता येईल, असे समाजसेवक सुभाष राणे यांनी हिंदुस्थान पोस्टशी बोलतांना स्पष्ट केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community