देशात सुरू असलेल्या धर्मांतर प्रकरणी गाजियाबाद पोलिसांनी काही दिवसांपूर्वी मुंब्र्यातून एकाला अटक केली होती. त्यानंतर धर्मांतराचा मुद्दा ऐरणीवर आला असताना वसईच्या माणिकपूर पोलिसांनी मुंब्र्यातून अटक केलेल्या मोहसीन याच्यावर वसईच्या एका कुटुंबीयांनी धर्मांतराचा आरोप केला आहे. गुढरीत्या बेपत्ता झालेले ५४ वर्षीय राजेश काही दिवसांनी घरी आले मात्र मोहम्मद फारुकी बनून आले, त्यांचे धर्मांतर करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
माणिकपूर पोलिसांनी अघोरी विद्या आणि काळी जादू प्रतिबंध कायदा अंतर्गत अटक करण्यात आलेल्या मोहसीन याने वसईतील ५४ वर्षीय राजेश यांना धर्मांतर करण्यास भाग पाडले असा आरोप राजेशचे कुटुंब करीत आहेत. मात्र याप्रकरणाचा तपास सुरू असून काही तांत्रिक पुराव्याचे नमुने तपासासाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी दिली.
(हेही वाचा – अर्धनग्न अवस्थेत पोलीस ठाण्यात घुसून केली अधिकाऱ्याला मारहाण)
नेमकी घटना काय?
वसई तालुक्यात राहणाऱ्या एका हिंदू कुटुंबातील राजेश (वय ५४) हे २६ मे रोजी गुढरीत्या बेपत्ता झाले होते. काही दिवसांनी ते घरी परत आले. परंतु त्यांनी स्वतःचे नाव बदलून मोहम्मद फारुकी ठेवले व घरी आल्यापासून ते विचित्र वागत असून मशिदीत जाणे, घरात नमाज पठण करणे असा आरोप राजेश यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. राजेश याचे धर्मांतर करण्यात आले आहे, या धर्मांतर करण्यामागे मुंब्रा येथे राहणारा मोहसीन या व्यक्तीचा हात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी या कुटुंबातील सदस्यांना मोहसीन नावाच्या एका व्यक्तीचा फोन येत होता, त्या व्यक्तीने त्यांच्या धर्माचा अपमान केला आणि त्याच्या अघोरी विद्येच्या बळावर त्यांना हानी पोहोचवण्याची धमकी देत होता व त्यांना धर्मांतर करण्यासाठी भीती दाखवली जात होती असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
माणिकपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित कुटुंबाने मोहसीन याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात १२ मे रोजी तक्रार दाखल केल्यानंतर भारतीय दंड संहिता कलम २९५ (अ) (जाणून बुजून आणि दुर्भावनापूर्ण कृत्य, कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक विश्वासांचा अपमान करून धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू) आणि कलम ३ (प्रचार किंवा प्रचार), मनुष्य बळी आणि इतर अमानुष, वाईट आणि अघोरी प्रथा आणि काळी जादू प्रतिबंध कायदा २०१३ अंतर्गत मोहसीन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस पथकाने मोबाईल फोनचे लोकेशन तपासून मुंब्रा येथून मंगळवारी मोहसीन याला अटक केली आहे. पोलिसांच्या तपासात राजेश हा बेपत्ता झाल्यानंतर तो मोहसीन सोबत मुंब्रा येथे काही दिवस वास्तव्यास होता व तिथेच त्याचे धर्मांतर करण्यात आले असावे अशी माहिती समोर आली. याबाबत माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही आरोपी आणि पीडित यांच्यात मोबाईलवरून झालेले संभाषण ताब्यात घेतले असून त्यातील आवाजाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. धर्मांतर संदर्भात मोहसीन याच्याकडे चौकशी सुरू आहे, असे पाटील म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community