‘दी कश्मीर फाइल्स’प्रमाणे ‘गोवा फाइल्स’ संदर्भात चर्चा होणार – रमेश शिंदे

170
‘दी कश्मीर फाइल्स’प्रमाणे ‘गोवा फाइल्स’ संदर्भात चर्चा होणार - रमेश शिंदे
‘दी कश्मीर फाइल्स’प्रमाणे ‘गोवा फाइल्स’ संदर्भात चर्चा होणार - रमेश शिंदे
काश्मीरमध्ये हिंदूंवर झालेल्या अनन्वित अत्याचाराला ‘दी कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने विश्वभरात वाचा फोडली. त्यानंतर ‘दी केरला स्टोरी’ चित्रपटातून ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु मुलींना धर्मांतरित करून त्यांचा जिहादी आतंकवादासाठी वापर करण्याचे षड्यंत्र मांडण्यात आले. गोव्यातही पोर्तुगिजांनी ‘इन्क्विझीशन’च्या नावाखाली जनतेवर केलेले अमानवी अत्याचार संपूर्ण देशाला कळणे आवश्यक आहे.
गोव्याचा खरा इतिहास समजून घेणे, हा जनतेचा मूलभूत अधिकार आहे. ख्रिस्ती धर्मगुरु पोप हे विश्वभरात अनेक ठिकाणी जाऊन ख्रिस्त्यांकडून झालेल्या अमानुष अत्याचारांची जाहीर माफी मागत असतात. तशी माफी गोव्यातील जनतेची त्यांनी आतापर्यंत का मागितलेली नाही? गोव्याचा तो काळा इतिहास अधिक काळ जनतेपासून लपवून ठेवता येणार नाही. ‘कश्मीर फाइल्स’प्रमाणे ‘गोवा फाइल्स’ वरही चर्चा व्हावी, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेला आंदोलनाला गती मिळावी, यासाठी प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही १६ ते २२ जून २०२३ या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे एकादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ अर्थात ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ‘हॉटेल डेलमन’ येथे आयोजित या पत्रकार परिषदेला हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे गोवा राज्य सचिव अधिवक्ता नागेश जोशी हे उपस्थित होते.
यावेळी रमेश शिंदे पुढे म्हणाले की, गोवा येथे गेल्या ११ वर्षांपासून होणार्‍या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’मुळे हिंदु राष्ट्राची चर्चा आता केवळ भारतातच नाही, तर वैश्विक पातळीवर होण्यास प्रारंभ झाला आहे. हिंदु राष्ट्राची मागणी करणारी आज अनेक व्यासपिठे निर्माण झाली आहेत. वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचे व्यासपीठ हे एकप्रकारे ‘डिस्मेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’सारख्या परिषदांना वैश्विक पातळीवरील प्रत्युत्तर आहे. सध्या देशातील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. देशात जिहादी आतंकवाद्यांना मोठ्या प्रमाणात अटक होत आहे. हिंदु कार्यकर्त्यांच्या हत्या केल्या जात आहेत. मणिपूर, नागालँड यांसारख्या राज्यांतील हिंदूंची घरे जळत आहेत. काश्मीरमधून कलम ३७० हटवले गेले, तरी तेथील हिंदू सुरक्षित झालेला नाही. पंजाबमध्ये खलिस्तानवादी पोलीस-प्रशासनाला आव्हान देत आहेत. देशभरात साक्षी, अनुराधा, श्रद्धा वालकर यांसारख्या असंख्य हिंदु मुलींच्या ‘लव्ह जिहादीं’कडून निर्घृण हत्या होत आहेत. बंदी घातलेल्या ‘पी.एफ.आय.’ या संघटनेचे भारताला वर्ष २०४७ पर्यंत इस्लामी राष्ट्र बनवण्याचे नियोजनबद्ध षड्यंत्र कागदपत्रांतून उघड झाले आहे. अशा स्थितीत हिंदु धर्म हा एकमात्र धर्म आहे की, जो देशाला एकसंध ठेवू शकतो, तो विश्वबंधुत्वाची आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ची संकल्पना मांडू शकतो. त्यामुळे भारताचे पुन्हा तुकडे होऊ द्यायचे नसतील, तर भारताला आदर्श रामराज्य अर्थात् हिंदु राष्ट्र बनवण्याशिवाय पर्याय नाही.
‘सनातन संस्थे’चे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस म्हणाले की, गेल्या वर्षी हिंदू अधिवेशनामध्ये ठरलेल्या ‘मंदिर संस्कृती रक्षणा’च्या धोरणानुसार १२ नोव्हेंबर २०२२ मध्ये म्हापसा, गोवा येथे, तर ४ आणि ५ फेब्रुवारी २०२३ मध्ये जळगाव, महाराष्ट्र येथे ‘राज्यस्तरीय मंदिर परिषदां’चे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रात मंदिर विश्वस्तांनी स्थापन केलेल्या ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने महाराष्ट्रभरातील मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता राबवण्याचा उपक्रम चालू आहे. आतापर्यंत १३१ हून अधिक मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू केली असून देशभरात त्याचे मोठ्या प्रमाणात अनुकरण चालू झाले आहे. उत्तराखंड राज्यातही तीन मंदिरांनी याचे अनुकरण केले आहे. महाराष्ट्राप्रमाणेच गोवा, कर्नाटक, छत्तीसगड, देहली आदी राज्यांतही याप्रमाणे राज्यस्तरीय मंदिर परिषदांचे भविष्यात आयोजन करण्यात येणार आहे.
यावेळी हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ म्हणाले की, या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला अमेरिका, इंग्लंड, बेल्जियम, जर्मनी, सिंगापूर, इंडोनेशिया, पाकिस्तान, बांग्लादेश आणि नेपाळ या देशांसह भारतातील २८ राज्यांतील ३५० हून अधिक हिंदु संघटनांच्या १५०० हून अधिक प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. या अधिवेशनाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर, काशी-ज्ञानवापी मुक्तीसाठी न्यायालयीन लढा देणारे अधिवक्ता विष्णु शंकर जैन, तेलंगाणा येथील हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह, ‘हिंदु इकोसिस्टिम’चे संस्थापक कपिल मिश्रा, ‘विश्व हिंदु परिषदे’चे संपर्कप्रमुख धर्माचार्य ह.भ.प. जनार्दन महाराज मेटे, ‘भारत माता की जय’ संघटनेचे सुभाष वेलिंगकर यांच्यासह अनेक उद्योजक, विचारवंत, लेखक, मंदिर विश्वस्त, तसेच अनेक समविचारी सामाजिक, राष्ट्रीय आणि आध्यात्मिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत.
या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय पातळीवर, तसेच राज्य आणि जिल्हा पातळीवर हिंदु संघटनांच्या एकत्रिकरणातून ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ स्थापन करण्यासाठी प्रत्यक्ष नियोजन करण्यात येणार आहे. समान कृती कार्यक्रमाच्या अंतर्गत ‘लव्ह जिहाद’, ‘हलाल सर्टीफिकेशन’, ‘मंदिरांची मुक्ती’, ‘घरवापसी’ आदी विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. या अधिवेशनात विविध परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात मंदिरांचे सुप्रबंधन, ‘अभिव्यक्ती – स्वातंत्र्य कि दायित्व?’ आदी विषयांवर परिसंवाद असणार आहेत.
हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता नागेश जोशी म्हणाले की, हिंदु राष्ट्राचे आंदोलन हे संवैधानिक मार्गाने होण्यासाठी, तसेच हिंदुहिताच्या मुद्द्यांवर न्यायालयीन संघर्ष करण्यासाठी अधिवक्त्यांची मोठी भूमिका आहे. या दृष्टीने या हिंदु राष्ट्र महोत्सवात १५० हून अधिक अधिवक्ते सहभागी होणार आहेत. सध्या ‘सर तन से जुदा’च्या घोषणा देणार्‍यांना मोकळीक देऊन हिंदुत्ववाद्यांचा छळ करण्यासाठी केल्या जात असलेल्या ‘हेट स्पीच’च्या तक्रारींच्या संदर्भात या महोत्सवात एक कायदेशीर चर्चा आयोजित करण्यात आली आहे.
या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ HinduJagruti.org याद्वारे, तसेच ‘HinduJagruti’ या ‘यु-ट्यूब’ चॅनेल आणि facebook.com/hjshindi1 या फेसबुक द्वारेही केले जाणार आहे. जगभरातील हिंदुत्वनिष्ठांनी या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चा लाभ घ्यावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले.
हेही पहा – 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.