मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वैश्विक शिक्षण मिळावे आणि हे विद्यार्थी स्पर्धेच्या युगात सतत पुढे राहावेत, यासाठी महानगरपालिका सतत प्रयत्न करीत असते. त्याच अनुषंगाने महानगरपालिकेने अमेरिकन शैक्षणिक संस्था खान अकादमी इंडियासोबत सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार महानगरपालिकेच्या इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये खान अकादमीकडून या विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान विषयाचे विनामूल्य शिक्षण दिले जाणार आहे.
महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिकेचा शिक्षण विभाग नवनवीन उपक्रम राबवित आहे. महानगरपालिका मुख्यालयात या करारावर मंगळवारी स्वाक्षरी करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, सह आयुक्त (शिक्षण) अजित कुंभार आणि खान अकादमी इंडियाच्या भारतातील संचालक स्वाती वासुदेवन यावेळी उपस्थित होते. महानगरपालिकेकडून अजित कुंभार आणि खान अकादमीकडून स्वाती वासुदेवन यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आठ भाषांमधून शिक्षण दिले जाते. त्यात मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराथी, तामिळ, तेलुगु, कन्नड आदी माध्यमांच्या शाळांचा समावेश आहे. महानगरपालिकेच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळांची संख्या १,१४६ असून, सुमारे ३ लाख १८ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच खासगी प्राथमिक अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांची संख्या १,०९८ असून, या शाळांमध्ये ३ लाख ७४ हजार १९५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल व्हावे यासाठी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने मिशन ॲडमिशन, मिशन मेरिट असे उपक्रम हाती घेतले आहेत. तसेच विद्यार्थ्यांमध्ये गणित आणि विज्ञान विषयांबाबत अधिक आवड निर्माण व्हावी, यासाठी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून महानगरपालिकेने अमेरिकन शैक्षणिक संस्था खान अकादमीसोबत सामंजस्य करार केला आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच या कराराची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
खान अकादमी अमेरिकेतील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेने नुकताच महाराष्ट्र शासनासोबतही शैक्षणिक करार केला आहे. आता महानगरपालिकेसोबत या संस्थेने करार केला आहे. त्यानुसार इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने गणित आणि विज्ञान विषय अधिक प्रभावशाली पद्धतीने शिकविण्यात येणार आहे. या करारानुसार विद्यार्थ्यांसह काही शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण विनामूल्य दिले जाणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून काही ठराविक शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community