Eknath Shinde : …अन् दिव्यांग ‘संदेश’च्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू; अवघ्या काही मिनिटांत मिळाला पाच लाखांचा धनादेश

166
मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी नेहमीच गर्दी असते. मुख्यमंत्री सामान्यांना भेटून त्यांच्या निवेदनावर, अर्जावर कार्यवाहीचे निर्देशही देतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कनवाळू स्वभावाचा प्रत्यय बुधवारी पुन्हा एकदा सर्वांना आला. पेशाने बांधकाम मजुर असलेल्या आणि अपघातात दोन्ही पाय, एक हात गमावलेल्या जव्हारच्या संदेश पिठोलेला मुख्यमंत्र्यांनी क्षणाचाही विलंब न लावता मदतीचा पाच लाखांचा धनादेश दिला. मुख्यमंत्र्यांच्या वागणुकीने भारावून गेलेल्या संदेशच्या आणि त्याच्या वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे मंत्रालयात आगमन झाले. नियोजित बैठका सुरू झाल्या. लोकप्रतिनीधी, सामान्य नागरिक देखील त्यांना भेटायला आले होते. या गर्दीत पालघर जिल्ह्यातील जव्हारचा संदेश पिठोले त्याच्या वडिलांसह मुख्यमंत्र्यांना भेटायला आला होता. मुख्यमंत्र्यांचे लक्ष व्हिलचेअरवर बसलेल्या संदेशकडे गेले. विधि व न्याय विभागाच्या आढावा बैठकीसाठी जात असताना संदेशजवळ थांबून मुख्यमंत्र्यांनी त्याची विचारपूस केली आणि ते समिती कक्षात आले. विधि व न्याय विभागाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी त्या संदेशला बोलावले. त्याच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी संदेशला तातडीने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मदत देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. सबंधित अधिकाऱ्यांना बोलावले. तात्काळ संपूर्ण प्रक्रिया झाली. धनादेशावर संबंधित अधिकाऱ्यांनी तिथेच मुख्यमंत्र्यांसमोरच स्वाक्षरी केली आणि संदेशच्या हातात पाच लाखाचा धनादेश मुख्यमंत्र्यांनी सुपूर्द केला.
बांधकाम मजूर असलेल्या संदेशचा कामावर असताना अपघात झाला त्यात त्याचा एक हात आणि दोन्ही पाय गमावले. आपल्या तरुण मुलाला व्हिलचेअरवरून आणाव्या लागलेल्या पित्याला मुख्यमंत्र्यांनी दिलासा देत तातडीने मदतीचा धनादेश दिला. शिवाय संदेशला कृत्रिम पाय, हात बसविण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे मंगेश चिवटे यांना समन्वय करण्याच्या सूचनाही दिल्या. व्यवसायासाठी स्टॉल सुरू कर. त्यासाठी पालघर येथे जागा देण्यासाठी मदत करतानाच बांधकाम महामंडळाकडून संदेशला मदत देण्याबाबतही कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.