धावत्या ट्रेनमध्ये विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न, CSMT स्थानकाजवळील धक्कादायक घटना

सकाळी ६ वाजता तैनात आलेल्या सुरक्षा गार्डची ड्युटी संपल्यानंतर बुधवारी (१४ जून) ही घटना घडली.

223
धावत्या ट्रेनमध्ये विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न, CSMT स्थानकाजवळील धक्कादायक घटना

मुंबईकरांची लाईफ लाईन असणाऱ्या लोकल ट्रेनमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हार्बर मार्गावरील लोकल ट्रेनमध्ये एका २० वर्षीय विद्यार्थिनीवर लैगिग अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. सीएसएमटी आणि मस्जिद बंदर रेल्वे स्थानका दरम्यान हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी एकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा मस्जिद बंदर परिसरात हमालीचे काम करणारा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

नवाझू करीम (वय ४०) असे अटक करण्यात आलेल्या नराधामाचे नाव असून त्याच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी लोकल ट्रेनमधील महिला डब्ब्यात रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत सुरक्षा रक्षक तैनात असतात. सकाळी ६ वाजता तैनात आलेल्या सुरक्षा गार्डची ड्युटी संपल्यानंतर बुधवारी (१४ जून) ही घटना घडली.

(हेही वाचा – दोनवेळा राज्यसभा मिळाल्यानंतर ‘या’ भाजप मंत्र्यांना लढवावी लागणार लोकसभेची निवडणूक)

पीडित विद्यार्थीनी ही दक्षिण मुंबईत राहणारी असून बुधवारी सकाळी ती ७.२७ ची सीएसएमटी-पनवेल लोकल पकडून बेलापूर येथे परीक्षेसाठी निघाली होती. ती द्वितीय श्रेणीच्या महिला डब्यातून प्रवास करत होतो. यावेळी त्याच डब्यामधून एक वृद्ध महिला देखील प्रवास करत होती. मात्र त्या डब्ब्यात सुरक्षा गार्ड नसल्यामुळे आरोपी करीम ट्रेन सुरू होताच डब्ब्यात चढला. सीएसएमटी ते मस्जिद दरम्यानच्या तीन ते चार मिनिटांच्या प्रवासात त्याने विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पीडित विद्यार्थिनी आणि वृद्ध सहप्रवासी यांनी आरडाओरड केला मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

पीडित तरुणीने आरोपी करीम याला विरोध केला. तेवढ्यात मस्जिद रेल्वे स्थानक येताच पीडित तरुणी ट्रेन मधून उतरून त्याच ट्रेन मधील पुरुषांच्या डब्ब्यात चढली. घाबरलेल्या तरुणीला बघून एका पुरुष प्रवाशाने तीला काही झाले का, मदत हवी आहे का अशी चौकशी केली. तेव्हा तीने घडलेला प्रकार पुरुष सहप्रवासी यांना सांगितला. त्यानंतर ट्रेन पुढे जात असताना सह प्रवासी याने रेल्वे पोलिसांच्या हेल्पलाइन नंबरवर कॉल करून घटनेची माहिती दिली असे एका वरिष्ठाने सांगितले.

हेल्पलाइनवर असलेल्या पोलिसांनी तात्काळ कॉलला प्रतिसाद देत सानपाडा स्थानकावर महिला पोलिसांना पाठवले. त्यांनी पीडित तरुणीला बेलापूरल येथील तिच्या परीक्षा केंद्रावर सोडले. परीक्षा केंद्रावर, तरुणीने परीक्षा पर्यवेक्षकांना तिच्या सोबत झालेल्या प्रसंगाबाबत सांगितले. तेव्हा पर्यवेक्षकाने तिला दुसऱ्या दिवशी परीक्षा देण्यास सांगून तिला सावरण्याचा वेळ दिला आणि पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यासाठी पाठवले.

महिला पोलिसांनी पीडित तरुणीला सीएसएमटी येथे आणून तीची तक्रार दाखल करून घेतली. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना रेल्वे पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी तीन पथके तयार करून मस्जिद बंदर स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांनी करीमला आठ तासांत मस्जिद बंदर परिसरातून अटक केली.

करीम हा मूळचा बिहारचा रहिवासी असून त्याच्याकडे काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का ते तपासण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.