मुंबई महापालिकेच्या शाळा गुरुवारी १५ जून पासून सुरु झाल्या ढोल ताशांच्या गजरात, लेझीमच्या तालावर उत्साही आणि आनंदी वातावरणात विद्यार्थ्यांच्या स्वागत करण्यात आले. महानगरपालिका शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे मोठ्या हर्षोल्हासात पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप करण्यात करण्यात आल्याने मुलांमध्ये एक वेगळाच आनंद चेहऱ्यावर दिसून येत आहे.
महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, सह आयुक्त (शिक्षण) अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने आज हे विविध उपक्रम राबवित विद्यार्थ्यांचे स्वागत केले. महानगरपालिका प्रशासनाने शालेय विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके, दप्तर, बूट अशा विविध शालेय वस्तू शाळेच्या पहिल्याच दिवशी उपलब्ध होतील, याकडे कटाक्षाने लक्ष दिले. त्यानुसार महानगरपालिका शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अनेक शाळांमध्ये मुलांसाठी आणि पालकांसाठी सेल्फी पॉईंट सजविण्यात आले होते. तर काही शाळांमध्ये मुलांसाठी आकर्षक खेळणी ठेवण्यात आली होती.
(हेही वाचा BMC : भारतातील अव्वल दहा शाळांमध्ये दादरच्या शिंदेवाडी महापालिका मुंबई पब्लिक स्कूलची निवड)
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ, प्रभारी उपशिक्षणाधिकारी निसार खान यांनी आकुर्ली रस्ता मनपा शाळा संकुलाला भेट देऊन वर्गाची पाहणी केली. सर्व मुख्याध्यापकांना व शिक्षकांना मार्गदर्शन केले आणि प्रवेश उत्सवातंर्गत केलेल्या कामांची पाहणी केली. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी यांनी भरूचा रस्ता मनपा शाळा संकुलला (दहिसर पश्चिम) भेट देऊन वर्गाची पाहणी केली. सर्व मुख्याध्यापकांना व शिक्षकांना मार्गदर्शन केले.
सकाळ सञाच्या शाळांमध्ये सात वाजून दहा मिनिटांनी आणि दुपार सञाच्या शाळांमध्ये १२ वाजून दहा मिनिटांनी महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये हा प्रवेश सोहळा आनंददायी वातावरणात साजरा झाला. गत वर्षी २०२२-२३ मध्ये ‘मिशन ऍडमिशन’ अंतर्गत १ लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा प्रवेश करण्यात आला होता. तर यंदा मिशन मेरिट हाती घेण्यात आले आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी सांगितले.
महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये पालक, शिक्षक आणि महानगरपालिका अधिकारी यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे स्वागत करुन शाळेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वागतासाठी शाळा परिसर तसेच वर्गखोल्या सजवण्यात आल्या होत्या. उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर नव्या शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस शासनाच्या निर्देशानुसार शाळा प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या स्वागतासोबतच त्यांना पुस्तके देखील सुपूर्द करण्यात आली.
Join Our WhatsApp Community