अनेकविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडीचे नेते सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल करत आहेत. तर या टीकेचा समाचार भाजप-शिवसेना शिंदे गटाकडून घेतला जात आहे. यातच आता कर्नाटक राज्यात सत्तांतर होताच काँग्रेस सरकारने भाजप सरकारने घेतलेले काही निर्णय फिरवण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसने भाजपा सरकारने आणलेला धर्मांतर विरोधी कायदा रद्द केला. तसेच सावरकरांचा धडाही अभ्यासक्रमातून वगळला. यावरून भाजप आक्रमक झाली असून, जोरदार टीका करण्यात येत आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरेंना सवाल केला आहे.
माझा महाविकास आघाडीला सवाल आहे की, ते महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणणार म्हणत आहेत तो हाच आहे का? आता उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया काय आहे? त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. ते ज्यांच्या मांडिला मांडी लावून बसले ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव पुसायला निघाले आहेत. ते धर्मांतरणाला पाठिंबा देत आहेत. आता उद्धव ठाकरेंचे मत काय हे त्यांनी सांगावे. यावरून उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी ही तडजोड केली हे स्पष्ट होते. मला असे वाटते की, असे निर्णय घेऊन त्यांना कुणाचेही नाव जनतेच्या मानस पटलावरून पुसता येणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते लोकांच्या मनातून सावरकर-हेडगेवार यांना काढू शकत नाहीत. सावरकरांना अभ्यासक्रमातून वगळू शकता, मात्र ते लोकांच्या मनातून सावरकर-हेडगेवार यांना काढू शकत नाहीत. ते लोकांच्या मनातून एकही स्वातंत्र्यसंग्रामी काढू शकत नाही. काँग्रेसचे सरकार आल्यानंतर यापेक्षा वेगळे काहीच अपेक्षित नाही. केवळ अल्पसंख्याकांचे लांगुलचालन करण्यासाठी कर्नाटकचे सरकार निर्णय घेत आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना केली.
Join Our WhatsApp Community