Bakri Eid : बकरी ईद : देवनार पशुवधगृहात मंडप उभारणीसह इतर व्यवस्थेकरता १८ कोटींचा खर्च

210

बकरी ईद निमित्त मुंबई महापालिकेच्या देवनार पशुवधगृहात मोठ्या प्रमाणात शेळ्या, मेंढ्या आणि शृंगी जनावरे आणले जातात. या शेळ्या मेंढ्यांकरता पशुवध गृहात तात्पुरते निवारे तसेच मंडप उभारले जातात. पावसाळ्यापासून संरक्षण म्हणून हे तात्पुरते निवारे व मंडप उभारले जात असून या सर्वांच्या उभारणीसह इतर पुरवल्या जाणाऱ्या सेवांकरता सुमारे १७ ते १८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर श्रावण हर्डीकर यांनी देवनार पशुवधगृहाला भेट दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी याबाबतची बैठक घेत याठिकाणी करण्यात येणाऱ्या व्यवस्थेत कोणत्याही प्रकारची कमी पडणार नाही याची विशेष काळजी घेतलेली आहे.

बकरी ईद हा मुस्लिम धर्मियांचा सण असल्याने दरवर्षी या उत्सवा दरम्यान सुमारे दोन ते अडीच लाख शेळ्या, मेंढ्या आणि १२ हजार ते १५ हजार शृंगी जनावरे देवनार पशुवधगृहात आणली जातात. दरवर्षी बकरी ईदच्या आधी दहा ते बारा दिवसांपूर्वी जनावरांना देवनार पशुवधगृहामध्ये प्रवेश दिला जातो. त्या अनुषंगाने यावर्षीच्या २८ जून २०२३ रोजी बकरी ईदच्या पूर्वी १२ दिवस आधी म्हणजे १६ जून २०२३ पासून जनावरांना देवनार पशुवधगृहामध्ये प्रवेश् सुरु  करण्यात आला आहे. त्या या मंडपाचा वापर १६ जून ते ३० जून २०२३ पर्यंत होणार आहे. बकरी ईद सणाची व्यवस्था सुमारे ६४ एकर एवढ्या जागेवर उभारली जाणार आहे. या जागेत उभारण्यात येणारे मंडप हे जनावरांकरता निवारे वाडे स्वरुपात बांधले गेले आहेत. त्याचा वापर १५ दिवसांकरता होणार असल्याने यासाठीचे निवारे मजबूत उभारणे आवश्यक आहे.

देवनार पशुवधगृहात सन २०१५ पासून बकरी ईद पावसाळ्याच्या सुमारास येत असल्याने तेव्हापासून दरवर्षी या सणासाठी पशुवधगृहात हद्दीत शेळ्या, मेंढ्या करता तात्पुरत्या स्वरुपात हे निवारे वाडे उभारले जातात. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपाचे निवारेवाडे व मंडप उभारण्यासाठी दोन कंत्राटदारांची नेमणूक केली असून म्हैस वर्गीय प्राण्यांकरता तात्पुरत्या स्वरुपाचे मंडप उभारणी, पोलिसांकरता वॉच टॉवर, इतर वापराचे मंडप, फुड कॅफे, प्रतिबंधात्मक विभाजक, तसेच सर्व मंडपांसाठी पंखे,टेबल, खुर्च्या, मंडपातील अग्निसुरक्षा व्यवस्था, पर्यायी विद्युत व्यवस्थेकरता विद्युत जनित्र आदींकरता एका कंत्राटदाराची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे या कामासाठी मागवलेल्या तिन निविदांमध्ये शेळ्या व मेंढ्यांकरता मंडप व निवारे वाडे उभारण्यासाठी रिध्दी एंटरप्रायझेस व  अनस इन्फ्रा या दोन कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. या दोन्ही कामांसाठी प्रत्येकी ५ कोटी ४७ लाख रुपये खर्च केले जात आहेत. तर म्हैस वर्गीय प्राण्यांकरता तात्पुरत्या स्वरुपाचे मंडप उभारणी, पोलिसांकरता वॉच टॉवर, इतर वापराचे मंडप, फुड कॅफे, प्रतिबंधात्मक विभाजक, तसेच सर्व मंडपांसाठी पंखे,टेबल, खुर्च्या, मंडपातील अग्निसुरक्षा व्यवस्था, पर्यायी विद्युत व्यवस्थेकरता विद्युत जनित्र आदींकरता अनस इन्फ्रा या कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कामांसाठी ५ कोटी ८३ लाख रुपये खर्च केले जात आहेत. त्यामुळे या तिन्ही कामांसाठी सुमारे १८ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

(हेही वाचा Wari Jihad : वारी जिहाद : वारकऱ्यांच्या तोंडून वदवले ‘अल्ला खिलावे, अल्ला पिलावे’, पंढरीच्या वारीत धर्मांतराचा प्रयत्न?)

देवनार पशुवधगृहाच्या सुमारे ७८ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर जनावरांसाठी तात्पुरती सोय उभारण्यात येणार आहे. याठिकाणी लाखो लोक देवनार पशुवधगृह येथे भेट देत असतात. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या आणि सुरक्षिततेच्या तसेच आपत्कालिन परिस्थितीत नियंत्रणाच्या दृष्टीकोनातून महापालिकेमार्फत देवनार पशुवध गृहात विशेष नियंत्रण कक्ष उभारण्यात येते. या नियंत्रण कक्षातून महापालिका सुरक्षा खाते आणि मुंबई पोलिस खाते यांच्याकडून या सणाच्या १५ दिवसांमध्ये येथील विविध उपक्रमांवर सीसीटिव्ही कॅमेरांद्वारे देखरेख ठेवत असतात. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या मागणीनुसार याठिकाणी सीसी टिव्ही कॅमेरे बसवण्यात येत असून यासाठी ७० लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. यासाठी विकी एंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात आली आहे.

अनधिकृत जनावरांची कत्तल, मांसविक्री संदर्भात महानगरपालिकेची ९९३०५०१२९३ क्रमांकाची हेल्पलाईन

बकरी ईद सणाच्या कालावधीत जनावरांची अनधिकृत आयात, कत्तल व अनधिकृत मांस विक्री विषयक नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्याकरिता महानगरपालिकेकडून ९९३०५०१२९३ हा हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्यात आला आहे. या क्रमांकावर नागरिकांना ३० जून २०२३ पर्यंत जनावरांच्या अनधिकृत आयातींच्या, कत्तलींच्या व अनधिकृत मांस विक्रीबाबतच्या तक्रारीं नोंदविता येणार आहेत.       धार्मिक पशुवधासाठी परवानगी देताना ती ‘धार्मिक पशुवध धोरण’ याच्या अधीन राहून देण्यात येते. तसेच दरवर्षी प्रमाणे म्हैसवर्गीय प्राण्यांचा धार्मिक वध हा केवळ देवनार पशुवधगृहातच करणे बंधनकारक आहे. या कालावधीत जनावरांच्या अनधिकृत आयातींच्या, कत्तलींच्या व अनधिकृत मांस विक्रीबाबत तक्रारी नागरिकांना नोंदविणे सोपे होईल आणि नियमबाह्य घटनांना आळा बसावा यासाठी महानगरपालिकेकडून या हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.